काँग्रेस कधीच संपली, मोदी फक्त त्याचे श्रेय घेतात! - अॅड. प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 11:30 PM2019-10-11T23:30:00+5:302019-10-11T23:30:02+5:30
अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’ ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये सर्वच मुद्यांना हात घालत दिलखुलास उत्तरे दिली.
- राजेश शेगोकार
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने घेतलेल्या ४० लाखांवर मतांमुळे ‘वंचित’ ची धास्ती सर्वच पक्षांनी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत ९ मतदारसंघातील निकाल फिरले व काँग्रेस, राष्टÑवादीला धक्का बसला, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मुख्यमंत्र्यांनी वंचित बहुजन आघाडी प्रमुख विरोधी पक्ष असेल असे विधान करून वंचितची ‘रेष’ मोठी झाल्याचे अधोरेखित झाले. या पृष्ठभूमीवर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’ ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये सर्वच मुद्यांना हात घालत दिलखुलास उत्तरे दिली.
प्रश्न: विधानसभा निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता?
उत्तर : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने मतदारांना समर्थ पर्याय उपलब्ध करून दिला. तब्बल ४० लाखांवर मते अन् ७४ विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते आम्ही घेतली. यावरून काँग्रेस, राष्टÑवादीऐवजी मतदारांची आम्हाला पसंती मिळत आहे हे स्पष्टच झाले. त्यामुळे विधानसभेची ही निवडणूक परिवर्तनाची निवडणूक आहे असे मी मानतो. ओबीसी त्यातही मायक्रो ओबीसी आमच्या सोबत ताकदीने उभा असल्यानेच या निवडणुकीत त्यांचा सत्तेत सहभाग होऊ शकतो हा विश्वास त्यांना देण्यात आम्ही यशस्वी झालो आहे.
प्रश्न : मायक्रो ओबीसींना सामावून घेतानाच तुमच्या सोबत असलेल्या मोठ्या घटकावर अन्याय होतो असे वाटत नाही का?
उत्तर : मुळीच नाही, माळी, वंजारी, धनगर या तिन्ही समाजाची संख्या मोठी आहे. यांच्या व्यतिरिक्त जो ओबीसी समाज आहे तो मायक्रो ओबीसीमध्ये मोडतो. मी सर्व समाजाला निवडणुकीत प्रतिनिधित्व दिले आहे. एवढेच नव्हे तर मराठा उमेदवारांनाही संधी दिली अन् ज्या ठिकाणी मुस्लीमबहुल मतदार आहेत तेथे मी नॉन मुस्लीम उमेदवार दिला आहे.
प्रश्न : केवळ प्रतिनिधित्व देण्यासाठी उमेदवारी दिलीत की जिंकण्याची शाश्वतीही आहे?
उत्तर: दोन्ही गोष्टी आहेत. निवडून येण्याची क्षमता आणि प्रतिनिधित्व याचा ताळमेळ नक्कीच पाहिला आहे. त्यामुळे या समाजाचे प्रतिनिधी तुम्हाला विधानसभेत दिसतील.
प्रश्न : एमआयएम सोबत काडीमोड घेतला अन् आता तुम्ही एमआयएमच्या उमेदवाराला पाठिंबाही दिला आहे. हे कसे?
उत्तर : एमआयएम सोबतची आघाडी आम्ही संपविलेली नाही त्यांनी घोषणा केली. त्यांचे उमेदवार अनेक ठिकाणी उभे आहेत. आमच्या उमेदवारांच्या विरोधातही आहेत; मात्र ज्या ठिकाणी एमआयएमचा उमेदवार विजयी होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत तेथे आम्ही पाठिंबा दिला तसे लेखी पत्रही काढले आहे. तो आमच्या रणनीतीचा भाग आहे.
प्रश्न : हा प्रकार म्हणजे तुमची एमआयएम सोबत अघोषित आघाडी कायम आहे असे समजावे का?
उत्तर : कोण काय समजेल ते समजो, भाजप, सेनेला थांबविण्यासाठी व प्रबळ विरोधी पक्ष निर्माण करण्यासाठी काही गोष्टी करणे अपेक्षित असते. मला वाटलं पाठिंबा दिला पाहिजे मी दिला.
प्रश्न : एमआयएमने ही तुमच्या उमेदवारांसदर्भात अशी भूमिका कुठेही घेतल्याचे दिसले नाही, तुम्हाला ते अभिप्रेत आहे का?
उत्तर : तो त्यांच्या प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाने काय करावे, हा त्यांचा अधिकार आहे. ज्या ठिकाणी ते आमच्या समोर रिंगणात आहे तेथे आम्ही त्यांच्याशी लढत देत आहोत.
प्रश्न : एमआयएम सोबत आघाडी संपल्याचा तोटा झाला असे वाटते का?
उत्तर : नाही, लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी मुस्लीम मते आमच्याकडे परावर्तित झाली नाहीत हे सत्य नाकारता येत नाही. या उलट दलित मते एमआयएमकडे वळली आहेत त्यामुळे तोटा झालेला नाही; मात्र मुस्लिमांच्या हिताचा विचार करणारा मुस्लीम समाजातील एक मोठा वर्ग आमच्या सोबत कायमच जुळला आहे.
प्रश्न : तुम्ही राष्ट्रवादीला शत्रू क्रमांक एक मानता अन् ईडीच्या प्रकरणात पवारांची पाठराखण करता?
उत्तर : हो पवारांवरील कारवाई चुकीची आहे. त्यामुळे सर्वात आधी सरकारचा निषेध केला. शरद पवारांचा राज्य सहकारी बँकेशी कुठलही संबंध नव्हता, हाय कोर्टाच्या आदेशातही त्यांचे नाव नव्हते. मग त्यांच्यावर कारवाई का? हा प्रकार विरोधी पक्ष संपविण्याचा आहे अन् तो लोकशाहीला घातक आहे त्यामुळेच मी विरोध केला.
प्रश्न: तुम्ही काँग्रेसमध्ये गांधीची हुकूमशाही, भाजपमध्ये मोदी हिटलर असे म्हणता? तुमच्या पक्षात तर तुमचाच शब्द चालतो त्याचे काय?
उत्तर : हो माझा शब्द चालतो; मात्र आमची निर्णय प्रक्रिया सामूहिक होते. मी सर्व समाजाला प्रतिनिधित्व देण्याची भाषा करतो व तसा वागतो.
प्रश्न: तुम्ही आयारामांना उमेदवारी देणार नव्हता; मात्र प्रत्यक्षात जाहीर झालेले उमेदवार मागे घेत आयारामांना संधी दिली आहे?
उत्तर: हा राजकीय रणनीतीचा भाग होता. अकोला पश्चिम, बुलडाणा व जळगाव जामोद येथे आधी जाहीर केलेल्या उमेदवारांना त्याबाबत कल्पना दिली होती. या जागांवर आमच्याकडे सक्षम पर्याय उपलब्ध होतेच. फक्त आम्ही आमच्या विरोधकांवर लक्ष ठेवून होतो. त्यांचे उमेदवार जाहीर होताच आम्ही नव्याने उमेदवार दिले.
प्रश्न : तुमच्या पक्षाचे अर्थात भारिप-बमसंच्या एकमेव आमदाराची उमेदवारी तुम्ही कापली? काही संकेत द्यायचे होत का?
उत्तर : हो, त्याला उमेदवारी कापणे असे का पाहता, तिथे दुसºयाल संधी दिली. ते गेली ३३ वर्षे या सत्तेत आहेत. राजकीय पदांवर आहे. दुसºया कुणाला संधी मिळाली हवी, संघटना प्रवाही असावी. मी कुठलाही संकेत दिला नाही व अन्यायही केला नाही माझी भूमिका या निमित्ताने कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली आहे.
प्रश्न: सत्तेसाठी पाठिंबा देण्याचे काम पडले तर कोणती आघाडी निवडाल?
उत्तर : आम्हीच सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत पोहचणार आहोत. त्यामुळे इतर पक्षांना आम्हालाच पाठिंबा द्यावा लागेल.
प्रश्न : आता आपली वाटचाल चळवळीतून सत्ता या दिशेने सुरू झाली आहे का?
उत्तर : हो निश्चितच, ज्या घटकांचे प्रश्न व समस्या घेऊन मी लढतो आहे त्यांच्या प्रश्नांसाठी आता मला सत्ता हवी आहे. त्यामुळेच ही लढाई आम्ही जिंकू असा विश्वास आहे. ओबीसीच्या घटकांमधील प्रत्येकाला प्रतिनिधित्व मिळावे हा आमचा प्रयत्न यशस्वी होईलच.
प्रश्न : पवार, विखे, मोहिते अशा राजकीय घरण्यांची पुढची पिढी राजकारणात आली आहे. तुम्ही सुजात आंबेडकरांना तशी संधी देत आहात का?
उत्तर : सुजात प्रचारात असतो, सभाही घेतो; मात्र त्याचा पिंड वेगळा आहे. अन् तो निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे त्यामुळे भविष्यात तो कोणत्या क्षेत्रात जाईल हे तोच ठरवेल. आमच्या चळवळीशी आम्ही बांधील आहोत, एवढे मात्र नक्की.
तुम्ही एमआयएमच्या एका उमेदवारला पाठिंबा दिला. मग काँग्रेस आघाडीतच का नाही सहभागी झाले?
त्याबाबत अनेक वेळा बोलून झाले आहे. काँग्रेस आता संपली आहे. काँग्रेसला गांधी परिवाराच्या बाहेर जाऊन नेतृत्व देण्याची गरज आहे; मात्र सध्या त्या पक्षाची अवस्था पाहता पुनरुज्जीवन होईल याबाबत मला शंकाच आहे. सत्तेसाठी एकाच दिवसात मेगाभरतीमध्ये भाजपमध्ये जाणाारे त्यांचे नेते व आमदार हे सत्तेसाठीच काँग्रेससोबत होते. अशा लोकांना मोठे करण्याचे काम काँग्रेसनेच केले. त्यामुळे काँग्रेस आपल्या कर्मानेच संपली. आता तर शेवटच्या स्टेजवर आहे. फक्त ती आम्ही संपवली याचे श्रेय मोदी घेतात.