नांदेड : आज देशात जाती-जातीत, धर्मा-धर्मात तेढ निर्माण करून जातीय दंगली घडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु याला कोणीही बळी पडू नये. काँग्रेस कार्यकर्त्यांनी नेहमी राष्ट्र उभारणीसाठी सजग राहावे. कारण काँग्रेसचा लढा हा सत्ता मिळविण्यासाठी नसून देश वाचविण्यासाठी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केले.नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी येथे मराठवाडा विभागीय कार्यकर्ता शिबिर झाले. राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. राजीव सातव, खा. कुमार केतकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.मोहन प्रकाश म्हणाले, इंग्रजांची गुलामी करणारे आज सत्तेत आहेत. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांचे महत्त्व वाटत नाही. काँग्रेसने स्वातंत्र्याची मूल्ये जोपासली. परंतु आज जातीमध्ये द्वेष पसरविण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. आज इलेक्ट्रॉनिक, सोशल मीडियाचा काळ नसून ‘माऊथ मीडिया’चा आहे. हे कार्यकर्त्यांनी लक्षात घेऊन शासनाच्या फसव्या योजनांबाबत नागरिकांशी सातत्याने चर्चा करावी.मोदी सरकारने संरक्षणमंत्र्यांना विश्वासात न घेता राफेल विमानांचा सौदा केला. या विमान खरेदीमध्ये ३६ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. तर कोकणातील तेल शुद्धीकरण प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार आहे. हा प्रकल्प सौदी अरेबियाला सोबत घेऊन केला जाणार आहे. आज सौदीमध्ये सर्व अभियंते पाकिस्तान येथील असून ते भारतात येणार नाहीत कशावरून, असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट म्हणाले, लोकांना भावनिक बनवून आणि खोटी आश्वासने देऊन सत्तेत येता येते. परंतु सरकार चालविणे अवघड आहे. नरेंद्र मोदी यांनीदेखील लोकांना भावनिक करून सत्ता मिळविली. परंतु ते सरकार चालविण्यात अपयशी ठरले आहेत. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणाºया भाजपाचा २०१९च्या निवडणुकांमध्ये पराभव अटळ आहे, असे मत खा. कुमार केतकर यांनी व्यक्त केले.‘सर्व घोषणा कागदोपत्री’शासनाने सर्व घटकांच्या हातावर तुरी देण्याचे काम केले असून शेतकºयांना नुसतीच आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसण्याचे धोरण आखले जात आहे. एकीकडे शेतकरी बोंडअळी, कर्जमाफी, गारपीट, दुष्काळ यामुळे त्रस्त असताना शासनाने अनेक घोषणा केल्या; परंतु त्या कागदोपत्री असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.
काँग्रेसचा लढा देश वाचविण्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:53 AM