मुंबई : राज्य सरकार आणि महापालिकेत सत्ताधारी भाजपा-शिवसेना युती सरकारच्या कारभाराविरोधात मुंबई काँग्रेसने आज आझाद मैदानावर निषेध मोर्चा काढला. सामान्य मुंबईकरांवर आर्थिक भुर्दंड लादणाऱ्या मालमत्ता कर, पार्किंग दर आणि बेस्ट दरवाढ यासारखे निर्णय ताबडतोब रद्द करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. केंद्र आणि राज्यातील निवडणुकांत काँग्रेसला मुंबईत दारुण पराभवाचा सामना करावा लागला. पराभवानंतर आलेली मरगळ झटकत आज काँग्रेस नेत्यांनी मोर्चाला हजेरी लावली.सत्ताधाऱ्यांनी आधी मालमत्ता करात वाढ केली. त्यानंतर जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर कोसळत असताना बेस्टची भाडेवाढ केली.शिवाय कोणतीही सुविधा न देता पार्किंगच्या नावाखाली १,८०० रुपये वसूल करण्याची योजना युतीने आखली आहे. मुंबईकरांवर आर्थिक बोजा टाकणारे हे निर्णय मागे घेण्याची मागणी केली. महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेवून निवेदन दिले. कोळीवाड्यांना पुनर्विकासासाठी सीआरझेडमधून वगळण्यात यावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम हाती घ्यावे, मराठा व मुस्लीम आरक्षण लागू करावे, म्हाडाचा हाऊसिंग स्टॉक रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या. मोर्चामध्ये मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर, गुरुदास कामत, आमदार सर्वश्री कालिदास कोळंबकर,भाई जगताप, पालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते बाळा आंबेरकर, बाबा सिद्धीकी, सुरेश शेट्टी, मधु चव्हाण, राजहंस सिंह, धर्मेश व्यास आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भ्रष्टाचाराविरोधात कॉँग्रेसचा मोर्चा
By admin | Published: January 28, 2015 5:18 AM