अतुल कुलकर्णी / मुंबईपुढील कोणत्याही निवडणुकांमध्ये भाजपासोबत जायचे नाही, असे शिवसेनेने ठरविल्यानंतर, तरी या संधीचा फायदा घेण्यासाठी दोन्ही कॉँग्रेस एकत्र येणार की, व्यक्तिगत दुराग्रहापायी जिल्हा परिषद, महापालिकांवरही पाणी सोडणार, असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्ते विचारत आहेत. कोणत्याही स्थितीत भाजपा सेनेसोबत जाणार नाही, असे राष्ट्रवादीने जाहीर करून आघाडीचा चेंडू काँग्रेसच्या कोर्टात टाकला आहे.युती तुटल्याचे समजताच, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रतिक्रिया बोलकी होती. ‘ज्यांनी आत्तापर्यंत एकत्र काम केले, त्यांची युती तुटल्याचे वाचून अतीव दु:ख झाले,’ असे पवारांनी सांगितले, पण ते सांगताना, त्यांनी चेहऱ्यावरचे हास्य लपवले नाही. शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला, तर तुम्ही सरकारला पाठिंबा देणार का? असे काहींनी विचारले, तेव्हा पवारांनी जर तरच्या प्रश्नांना आपण उत्तर देत नाही, असे सांगून टाकले.गेल्या काही दिवसांमधली पवारांची विधाने आणि घटनाक्रम पाहिला, तर राजकीय वाऱ्याची दिशा त्यांना सगळ््यात आधी समजली होती, हे स्पष्ट होते. एकीकडे युतीच्या बैठकांचे गोडवे गायले जात असताना दोन्ही काँग्रेसनी एकत्र आले पाहिजे, असे विधान सगळ््यात आधी पवारांनी केले होते. त्यानंतर, अजित पवारांनी नांदेडला बंद दाराआड प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा केली, तर मुंबईत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी राज्यात कोठेही भाजपा शिवसेनेसोबत युती करणार नाही, जर कोणी केली, तर त्यांचे एबी फॉर्मसुद्धा पक्ष रद्द करेल, अशी स्पष्ट भूमिका जाहीर केली.राष्ट्रवादी भाजपासोबत हातमिळवणी करेल, असे पृथ्वीराज चव्हाण बोलत असताना, या घटना-घडामोडी घडल्या आहेत, हे विशेष. युती तुटल्याची घोषणा झाल्यानंतर, गुरुवारी आणि शुक्रवारी दोन्ही दिवस खा. अशोक चव्हाण यांच्याशी मी स्वत: बोललो, असे सांगून तटकरे म्हणाले, आघाडी करण्याच्या बाजूने आम्ही असलो, तरी आता काँग्रेसने घाई करण्याची गरज आहे. राष्ट्रवादीने आघाडीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असली, तरी काँग्रेस मात्र, यावर मौन बाळगून असल्याचे चित्र उभे करण्यातही राष्ट्रवादी यशस्वी झाली आहे. दुसरीकडे विधानसभेनंतर पहिल्यांदा भाजपा सेना एकमेकांसमोर दंड थोपटून उभी असताना, त्याचा फायदा घेण्यासाठी दोन्ही काँग्रेसना एवढी चांगली संधी पुन्हा मिळणार नाही. दोघांच्या भांडणात जर का जिल्हा परिषदाही दोन्ही काँग्रेसच्या हातून गेल्या, तर दोघांचाही राजकीय पायाच ठिसूळ होईल, याचे भान दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांनी वेळीच बाळगण्याची गरज असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखवले.
आघाडीचा चेंडू आता काँग्रेसच्या कोर्टात!
By admin | Published: January 28, 2017 1:08 AM