Congress Maharashtra Election 2024: सोलापूर काँग्रेसमध्ये चाललंय काय असा प्रश्न पडावा, असाच प्रकार घडला आहे. लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या माजी आमदार दिलीप माने यांना विधानसभा निवडणुकीची उमदेवारी देण्यात आली. पण, त्यांना पक्षाकडून एबी फॉर्मच देण्यात आला नाही. त्यामुळे माने यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. त्यामुळे सोलापूर काँग्रेसमधील गटबाजीचा मुद्दा चर्चेत आला आहे.
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये नाट्यमय घटनाक्रम घडला. दिलीप माने यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. पण, त्यांना एबी फॉर्म पक्षाकडून दिला गेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. प्रणिती शिंदे आणि काँग्रेसने दगाफटका केल्याचा आरोप माने समर्थकांनी केला.
एबी फॉर्मच्या प्रतिक्षेत असलेल्या दिलीप माने यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला, तर त्यांचा मुलगा पृथ्वीराज माने यांनी पूरक म्हणून अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं? दिलीप मानेंनी सांगितलं
दिलीप माने म्हणाले, "मला शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघण्यासाठी सांगण्यात आलं होतं. ऐनवेळी मला एबी फॉर्म दिला नाही. एबी फॉर्म होता, पण माझ्यापर्यंत पोहोचवला नाही. मी आता अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. कार्यकर्त्यांना विचारून अर्ज ठेवण्याबाबत निर्णय घेईन", असे दिलीप माने यांनी सांगितले.
"काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ असताना तो सोडला. ही सगळी मॅच फिक्सिंग आहे. प्रत्येकजण आपली बाजू सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतोय. आपली मुलगी, पत्नी कशी निवडून येईल यासाठी सगळं केलं जात आहे आहे", अशी टीका माने यांनी केली.
"ज्यांनी तिकीट जाहीर केलं, त्यांची जबाबदारी होती की, एबी फॉर्म देखील दिला पाहिजे. सगळेच यामध्ये कमी पडले आहेत. जिथं काँग्रेसला संधी न देता मित्रपक्षाला जागा सोडण्यात आली, तिथं कुणीही विश्वास ठेवू नका", अशी नाराजी दिलीप माने यांनी व्यक्त केली.