ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 14 - गोवा विधानसभेत संख्याबळाच्या आधारावर काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, काँग्रेसने केलेल्या एक छोटाशा चूकीची किंमत त्यांना विरोधी बाकावर बसून चुकवावी लागणार आहे. गोव्यात काँग्रेसने शेवटच्या मिनिटाला गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांच्या विरोधात उमेदवार उतरवण्याचा घेतलेला निर्णय त्यांना महाग पडला.
सुरुवातीला काँग्रेसने दोन जागांवर गोवा फॉरवर्ड पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षामध्ये झालेल्या छुप्या समझोत्यानुसार फातोर्डा विधानसभेच्या जागेवर काँग्रेस विजय सरदेसाईंचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला होता. पण कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे काँग्रेसने शेवटच्या क्षणाला फातोर्डा विधानसभेत उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे विजय सरदेसाई नाराज झाले आणि सत्ता स्थापनेच्यावेळी त्यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
आणखी वाचा
फातोर्डामध्ये सरदेसाई निवडून आले. काँग्रेस उमदेवार जो डीसिल्व्हा यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. 40 सदस्यांच्या गोवा विधानसभेत काँग्रेसचे सर्वाधिक 17 आणि भाजपाचे 13 आमदार निवडून आले आहेत. काँग्रेसपेक्षा आमदारांची संख्या कमी असूनही भाजपाने छोटया पक्ष आणि अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.