“महाविकास आघाडी एकत्र आहे, भाजपविरोधात सक्षमपणे व एकजुटीने लढा देईल”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 08:35 AM2023-07-05T08:35:12+5:302023-07-05T08:35:49+5:30
Maharashtra Political Crisis: विरोधकांची वाढती ताकद पाहून भाजप बिथरला असून नैराश्येतून पक्ष फोडण्याचे काम करत आहे, अशी टीका करण्यात आली आहे.
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रात एक असंवैधानिक सरकार सत्तेवर असून अपात्रतेच्या मुद्द्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा फोडाफोडीचे राजकारण करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन कमळचा हा प्रकार जनतेला आवडलेला नाही. कर्नाटकच्या जनतेने भाजपला घरी बसवले आहे. महाराष्ट्रात आधी उद्धव ठाकरे यांना व आता शरद पवार यांना काही आमदार सोडून गेले आहेत परंतु या दोन्हीही नेत्यांच्या मागे आजही मोठे जनसमर्थन आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत व भाजपाविरोधात एकजुटीने व सक्षमपणे यशस्वी लढा देऊ, असे कर्नाटकचे मंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी स्पष्ट केले.
प्रसार माध्यमांशी बोलताना एच. के. पाटील म्हणाले की, देशात मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांची एक मोठी आघाडी होत आहे. विरोधकांची वाढती ताकद पाहून भारतीय जनता पक्ष बिथरला असून नैराश्येतून पक्ष फोडण्याचे काम भाजप करत आहे. या पक्षफोडीसाठी ईडी, सीबीआय अशा तंत्रांचा वापर केला जात आहे. महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण सुरु असताना काँग्रेस पक्ष एकजूट व मजबूतपणे उभा असून पक्षनिष्ठा काय असते हे त्यांनी या एकजूटीतून दाखवून दिले आहे, असे पाटील यांनी नमूद केले.
काँग्रेस पक्ष एक मोठी ताकद म्हणून राज्यात उभी राहील
काँग्रेसच्या एका बैठकीला ३९ आमदार उपस्थित होते, जे आमदार या बैठकीला उपस्थित नव्हते त्यांनी आम्हाला त्याची सूचना आधीच दिली होती. काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात एकजूट असून मल्लिकार्जून खर्गे, सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या मार्गदर्शानाखाली काम करत आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष एक मोठी ताकद म्हणून राज्यात उभी राहील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना एच. के. पाटील म्हणाले की, या बैठकीत विरोधी पक्षनेते पदासंदर्भात चर्चा झाली नाही. योग्यवेळी विरोधी पक्षनेते पदासंदर्भात सर्व घटकांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल.