Manikrao Kokate vs Congress Harshavardhan Sapkal, Maharashtra Farmers: "बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे, पण त्याचा अपमान करण्याची एकही संधी भाजपा युती सरकार सोडत नाही. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना सत्तेचा एवढा माज चढला आहे की, ते सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. शेतकऱ्यांना भिकारी म्हटल्यानंतर आता या महाशयांनी कर्जमाफीचे काय करता, लग्न-साखरपुडे करता, शेतीत गुंतवता का? असा प्रश्न विचारून पुन्हा एकदा अपमान केला आहे. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या कोकोटेंना मंत्रिमंडळातून हाकलून द्या," अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते, ते अद्याप पाळलेले नाही. कर्जमाफीसाठी पैसे नाहीत असे सरकार म्हणते. त्यात कर्जमाफीवरून कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्यांना प्रश्न म्हणजे ‘चोर तो चोर आणि वरून शिरजोर’ असा प्रकार आहे. शेतकऱ्याला सरकार मदत करते किंवा कर्जमाफी करते म्हणजे काही उपकार करत नाही. तो जनतेचा पैसा आहे, कोकाटेच्या घरचा नाही. सरकारची धोरणे जर शेती व शेतकऱ्याला अनुकुल असती तर शेतकरी सरकारच्या मदतीवर कशाला अवलंबून राहिल. पण भाजपा युती सरकार हे शेतकरीविरोधी आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत."
"मूठभर उद्योगपतींना १६ लाख कोटींचे कर्जमाफ केले तेव्हा असा प्रश्न विचारण्याची धमक कोकाटे किंवा सरकारने दाखवली नाही. मग शेतकऱ्यांनाच प्रश्न विचारण्याची हिंमत का होते? कोकाटेंनी यापूर्वीही भिकारीसुद्धा एक रूपया घेत नाही. आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत विमा देते असे वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अपमान केला होता. सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा रोग या महोदयांना जडला आहे. त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी," अशी मागणी केली.
"मंत्र्यांनी बोलताना तारतम्य बाळगावे, असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे वर्तमानपत्रात वाचले पण मंत्री हे मुख्यमंत्र्यांनाही जुमानत नाहीत. वाट्टेल ते बरळतात. फडणवीस सरकारमध्ये एक एक मंत्री नमुना आहे असे आम्ही म्हटले होते. माणिकराव कोकाटे हा त्यातीलच एक नमुना आहे. अशा मंत्र्यांना आवर घालावी. शेतमालाला भाव नाही, हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे, शेतकरी संकटात असून दररोज शेतकरी आत्महत्या करत आहे. त्याची कृषी मंत्री वा भाजपा युती सरकारला लाज वाटत नाही पण उलट शेतकऱ्यांनाच अजब प्रश्न विचारता, हा सत्तेचा माज शेतकरी नक्की उतरवेल हे लक्षात ठेवा", असा इशाराही सपकाळ यांनी दिला.