Congress News: इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी नागपूरचे प्रशांत कोरटकर यांच्यावर येथील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. , इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मी धमकीचा फोन केलेला नाही. या ऑडिओ क्लिपमधील आवाजदेखील माझा नसून तो मॉर्फ करण्यात आला आहे, असा दावा कोरटकर यांनी केला आहे. यानंतर आता यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली असून, काँग्रेस नेत्यांनी यावर टीका केली आहे.
इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देताना वापरलेली भाषा व त्याचा आशय पाहता सरकार कोणत्या विचाराच्या लोकांना पुढे करत आहे हे दिसून येते. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील छावा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी काँग्रेसने शिवजयंती दिनी केली होती, पण त्यावर सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. सरसंघचालक गोळवलकर यांनी ‘बंच ऑफ थॉट’ या पुस्तकात संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले आहे तसेच सावरकर यांनीही संभाजी महाराजांबद्ल आक्षेपार्ह लेखन केले आहे. चिटणीसाच्या बखारीपासूनचा जो खेळ सुरु आहे त्याची पाठराखण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची या विषयावर चुप्पी आहे का? आणि छावा चित्रपट प्रमोट करण्यात कुचराई करत आहेत का? हे प्रश्न असताना इतिहासतज्ञ इंद्रजीत सांवत यांना धमकी देत, ‘हे राज्य आमचे आहे’, अशी धमकी दिली, महाराष्ट्रात घाशीराम कोतवालाचे राज्य आहे का? असा संतप्त सवाल करत घाशीराम कोतवाल जर महाराष्ट्राचा गृहविभाग चालवत असतील तर ते कदापी खपवून घेतले जाणार नाही असा इशारा हर्षवर्धन सपकाळ दिला.
हे महाराष्ट्रात चालणार नाही
इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, हा धमकी देणारा पोलिसांच्या विश्रामगृहावर कसा काय थांबतो? त्याला सुरक्षा कशी पुरवण्यात आली? कोण मुख्यमंत्री, गृहमंत्री असताना या व्यक्तीची संपत्ती वाढली हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. घाशीराम कोतवालाचे बगलबच्चे जर धमक्या देत असतील तर ते गंभीर आहे. याची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ‘हम करे सो कायदा’ व ‘घाशीराम कोतवाल करे सो कायदा’ हे महाराष्ट्रात चालणार नाही, या शब्दांत हर्षवर्धन सपकाळ यांनी निशाणा साधला.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वरला मुकबर खानाकडे कुणी पकडून दिले, ही मांडणी सावंत यांनी केली होती. त्यावरून कोरटकर यांनी सोमवारी रात्री १२ वाजता सलग दोनवेळा फोन करून सावंत यांना धमकावले. त्यांना आलेल्या फोन कॉलच्या संभाषणाची क्लिप सावंत यांनी मंगळवारी सकाळी पोस्ट केली. यामध्ये 'तुम्ही कोल्हापुरात जिथे असाल तिथे लक्षात ठेवा, आमची ताकद कमी लेखू नका. तुम्ही ब्राह्मण मुख्यमंत्री आणि शासनामध्येच आहात, हे विसरू नका. याद राखा अशी ब्राह्मण विरोधी वक्तव्य करू नका. एक दिवस तुम्हाला आमची औकात दाखवून देऊ. आम्हाला काही बोललात तर घरात घुसून मारू,' अशी धमकी देत कोरटकर याने सावंत यांना शिवीगाळ केली आहे.