“पुस्तकावर बंदीची मागणी करायला हवी होती, उदयनराजे ‘बंच ऑफ थॉट’ वर गप्प का?”; काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 19:55 IST2025-04-12T19:52:06+5:302025-04-12T19:55:50+5:30

Congress Harshwardhan Sapkal News: उदयनराजे यांच्या पक्षाचे सरकारच ‘महाराजांचा अपमान करा व संरक्षण मिळवा’ योजना राबवत आहे, अशी टीका करण्यात आली आहे.

congress harshwardhan sapkal asked question to udayanraje about chhatrapati shivaji maharaj issue | “पुस्तकावर बंदीची मागणी करायला हवी होती, उदयनराजे ‘बंच ऑफ थॉट’ वर गप्प का?”; काँग्रेसचा सवाल

“पुस्तकावर बंदीची मागणी करायला हवी होती, उदयनराजे ‘बंच ऑफ थॉट’ वर गप्प का?”; काँग्रेसचा सवाल

Congress Harshwardhan Sapkal News: भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. अमित शाह यांच्या या दौऱ्यावेळी रायगडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उदयनराजे, शिवेंद्रराजे यांच्यासह महायुतीतील अनेक नेते उपस्थित होते. यावेळी उदयनराजे यांनी अमित शाह यांच्यासमोर काही मागण्या ठेवल्या. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेत्यांनी उदयनराजेंना थेट सवाल केला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत एक कायदा करण्यात यावा, जो नॉन बेलेबल असावा. १० वर्ष जामीन मिळता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा. जेणेकडून कुठल्याही प्रकारचे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये. सिनेमॅटिक लिबर्टीच्या संदर्भात एक सेंन्सर बोर्ड स्थापन करण्यात यावे. जेणेकरून एखादा स्वतःच्या कल्पनेतून एखादी कादंबरी लिहितो पण त्याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसतो. त्यामुळे अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि युगपुरुषांबाबत गैरसमज निर्माण होत आहे, यामुळे एक सेंसर बोर्डची स्थापना व्हावी, अशी मागणी उदयनराजे यांनी रायगडावरून बोलताना केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावरून उदयनराजे यांच्यावर टीका केली. 

उदयनराजे ‘बंच ऑफ थॉट’ वर गप्प का?

पत्रकार परिषदेत बोलताना भाजपा खासदार उदयनराजे यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना १० वर्षांच्या शिक्षेचा कायदा करा, अशी केवळ मागणी करून काय उपयोग. ते ज्या पक्षाचे खासदार आहेत, तो भाजपा गोलवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉट’ या पुस्तकाला संविधानापेक्षा जास्त महत्त्व देतो. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह लिखाण केलेले आहे, त्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी खासदार उदयनराजे यांनी केली असती तर बरे झाले असते. उदयनराजे यांच्या पक्षाचे सरकारच ‘महाराजांचा अपमान करा व संरक्षण मिळवा’ योजना राबवत आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.  

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत फिरण्यापेक्षा मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे व शेतकऱ्यांना मदत करावी. राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारने निवडणुकीत जनतेला मोठी मोठी आश्वासने देऊन सत्तेत आले आणि सत्तेत आल्यानंतर जनतेचा विश्वासघात केला. लाडक्या बहिणी, एसटी कामगार व शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केली आहे. शेतमालाला भाव नाही, पीक विमाची भरपाई नाही, शेतकरी कर्जमाफी नाही, अशा अस्मानी सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी जीवन संपवत आहे, हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे. हे आंधळे, बहिरे व मुके सरकार आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे, अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष आहे, रोजगार नसल्याने गावातून लोक शहराकडे पलायन करत आहेत, पिण्यासाठीही पाणी नाही. जलजीवन योजनेला भ्रष्टाचाराने पोखरले असून ही योजनाच भंकस आहे पण सरकारचे त्याकडे लक्ष नाही, अशी टीका सपकाळ यांनी केली. 

 

Web Title: congress harshwardhan sapkal asked question to udayanraje about chhatrapati shivaji maharaj issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.