“अमित शाहांसह फिरण्यापेक्षा CM, DCM यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे”: सपकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 18:32 IST2025-04-12T18:30:40+5:302025-04-12T18:32:04+5:30

Congress Harshwardhan Sapkal News: शेतमालाला भाव नाही, पीक विमाची भरपाई नाही, शेतकरी कर्जमाफी नाही, हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

congress harshwardhan sapkal criticized mahayuti govt over farmers issues in state | “अमित शाहांसह फिरण्यापेक्षा CM, DCM यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे”: सपकाळ

“अमित शाहांसह फिरण्यापेक्षा CM, DCM यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे”: सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: नांदेड जिल्ह्यातील हरिदास बोंबलेची आत्महत्या ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे. या शेतकऱ्याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कर्ज वसुलीच्या दबावाला कंटाळून जीवन संपवले. अवकाळी पाऊस व गारपीटीने झालेल्या नुकसानीची भरपाई सरकारने दिलेली नाही, कोणतीही सरकारी मदत नाही आणि कर्जमाफीचे आश्वासनही पाळले नाही, यामुळे जगणे असह्य झालेले शेतकरी गळफास लावून आपले जीवन संपवू लागले आहेत. हे आंधळे, बहिरे व मुके सरकार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत फिरण्यापेक्षा मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे व शेतकऱ्यांना मदत करावी, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की,  राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे, अनेक भागात पाण्याचे दुर्भिक्ष आहे, रोजगार नसल्याने गावातून लोक शहराकडे पलायन करत आहेत, पिण्यासाठीही पाणी नाही. जलजीवन योजनेला भ्रष्टाचाराने पोखरले असून ही योजनाच भंकस आहे पण सरकारचे त्याकडे लक्ष नाही, या शब्दांत सपकाळ यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.

संकटात सापडलेला शेतकरी जीवन संपवत आहे, हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे

राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारने निवडणुकीत जनतेला मोठी मोठी आश्वासने देऊन सत्तेत आले आणि सत्तेत आल्यानंतर जनतेचा विश्वासघात केला. लाडक्या बहिणी, एसटी कामगार व शेतकऱ्यांची सरकारने घोर फसवणूक केली आहे. शेतमालाला भाव नाही, पीक विमाची भरपाई नाही, शेतकरी कर्जमाफी नाही, अशा अस्मानी सुलतानी संकटात सापडलेला शेतकरी जीवन संपवत आहे, हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणे आहे, या शब्दांत सपकाळ यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

दरम्यान, एमपीएससी ही लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सातत्याने खेळ करत आहे. २०२३ साली परिक्षेची जाहिरात आली त्यानंतर २०२४ मध्ये पूर्व परिक्षा झाली आणि त्याचा निकाल आला. आर्थिक मागास प्रवर्ग नसल्याने मुख्य परिक्षा देण्यासाठी एक अर्ज भरावा लागत आहे पण एमपीएसचे पोर्टलच सारखे बंद असते, हे पोर्टल बंद राहणार नाही याची दक्षता घ्यावी, पारदर्शक प्रक्रिया राबवा अथवा ऑफलाईन एक खिडकी योजना राबवून फॉर्म भरुन घ्या, त्यानंतर नोटीफिकेशन काढून ४५ दिवसांनंतर परिक्षा घ्या. पण एमपीएससीला परीक्षेची खूपच घाई झालेली दिसत आहे. एमपीएससीने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरु केलेला खेळ थांबवावा, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.  

 

Web Title: congress harshwardhan sapkal criticized mahayuti govt over farmers issues in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.