आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 18:24 IST2025-04-16T18:22:41+5:302025-04-16T18:24:00+5:30
Congress Harshwardhan Sapkal News: भिसे परिवाराचे सांत्वन मंगेशकर कुटुंबापैकी कुणीही केलेले नाही. किमान चौकशी करू, अनियमितता दूर करू, हे काहीही म्हणत नाही, असे सपकाळ यांनी म्हटले आहे.

आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
Congress Harshwardhan Sapkal News: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात चौथा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. संपूर्ण राज्यात तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. या संदर्भात विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. तेव्हा चौथा शेवटचा अहवाल मिळाल्यानंतर त्वरित निर्णय घेऊन पारदर्शकपणे दोषींवर योग्य कारवाई केली जाईल व पीडित कुटुंबाला न्याय मिळेल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. यावरून राजकीय वर्तुळात तीव्र आरोप-प्रत्यारोप झाले. यानंतर आता मंगेशकर कुटुंबीयांवर टीका करण्याचा सिलसिला सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
कसले ते मंगेशकर कुटुंब. ही लुटारुंची टोळी आहे. यांच्यापैकी कुणी कधी दान केल्याचे पाहिले आहे का? गाणे चांगले गायले म्हणून सगळ्यांनी त्यांना मिरवले. लता दीदी, आशा दीदी, हे दीदी, ते दीदी. त्यांचे एवढेच जर लोकांसाठी आणि देशासाठी समर्पण असते तर त्यांनी सेवा केली असती. यांची स्टोरी रोज वाचतो आहे. ज्या खिलारे पाटलांनी त्यांना जमीन दिली त्यांनाही सोडले नाही. यांच्यात कसली माणुसकी आहे? हे माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असे मानतो. अशा प्रकारे मॅनेटमेंट चालवून गरिबांची लूट करून शोषण करणारे असतील तर हे कलंक आहे. यामध्ये यांना कुणीही साथ देऊ नये. यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. चॅरिटी म्हणून योजनेचा फायदा घ्यायचा आणि गरिबांना लुटायचे हे असले धंदे बंद झाले पाहिजेत, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली होती. यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा मंगेशकर कुटुंबावर टीका केली आहे.
भिसे परिवाराचे सांत्वन मंगेशकर कुटुंबापैकी कुणीही केलेले नाही
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय बांधत असताना त्यावेळच्या सरकारने मदत केली. तनिषा भिसेंना साडेपाच तास ताटकळत ठेवण्यात आले. त्यातून त्यांचा बळी गेला. मातृत्वासाठी आसुसलेल्या महिलेचा अशा पद्धतीने मृत्यू होणे ही बाब हृदयद्रावक आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेली ही पहिली घटना नाही. पैशांसाठी अडवले जाते या तक्रारी कायम येतात, मोठ्या प्रमाणावर अनियमितता आहे. डॉ. घैसास यांची बाजू घेताना डॉ. केळकर म्हणतात राहु केतु डोक्यात आले आणि १० लाख मागितले. इतके बेजबाबदार वक्तव्य त्यांनी केलं. सरकार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची बाजू सरकार घेत आहे. पंडित नेहरुंनी लता मंगेशकरांना ऐ मेरे वतन के लोगो हे गीत म्हटल्यावर सन्मानित केले होते ही देखील वस्तुस्थिती आहे. परंतु, प्रासंगिकता महत्त्वाची आहे. आता ही घटना घडली आहे. मंगेशकर कुटुंबाने या प्रकरणावर साधलेले मौन हे कर्कश आहे. ते या संदर्भात माफी मागत नाहीत, भिसे परिवाराचे सांत्वन मंगेशकर कुटुंबापैकी कुणीही केलेले नाही. किमान चौकशी करू, अनियमितता दूर करू, हे काहीही म्हणत नाही. त्यांचे या प्रकरणावरचे मौन हे अमानुष आहे, या शब्दांत हर्षवर्धन सपकाळ यांनी निशाणा साधला.
दरम्यान, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी डॉ घैसास यांना पाठिंबा दर्शवला आहे. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने नोटीस पाठवल्यावर त्या चौकशीमध्ये घैसास निर्दोष म्हणून सिद्ध होतील. या सगळ्या प्रकरणात शासन जरी चूक कोणाची हे जरी अहवालाचा अभ्यास करून समोर आणणार असले तरी इंडियन मेडिकल असोसिएशन डॉ. घैसास यांच्या सोबत असल्याचे आयएमएने सांगितले आहे. या प्रकरणात डॉ. घैसास यांची चूक नसून त्यांना दोषी ठरवणे चूक असून इंडियन मेडिकल असोसिएशनने त्यांची बाजू मांडली आहे.