Congress Harshwardhan Sapkal News: मागील आठवड्यात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत नागपुरात झालेल्या दंगलींचीच चर्चा होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी नागपुरात येत संघभूमी-दीक्षाभूमीत नमन केले आणि भविष्यातील पंचसूत्रीचे संकेत दिले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी संघ व भाजपमध्ये ‘ऑल इज वेल’ असल्याचा संदेश देत भविष्यात समन्वय आणखी मजबूत होईल हा कृतीतून संदेश दिला. तर दुसरीकडे भाषण व सोलारमधील भेटीतून सामाजिक समरसता, आत्मनिर्भर भारत, आरोग्य क्षेत्राचे बळकटीकरण यावर सरकारचा भर असेल याचे स्पष्ट संकेतच दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला दिलेल्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
मागील दहा वर्षांमध्ये अनेकदा संघ व भाजपमध्ये हवा तसा समन्वय नसल्याचा मुद्दा अनेकदा चर्चेला आला होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीअगोदर एक वक्तव्य करत या चर्चेला आणखी मजबुती दिली होती. लोकसभा निकालात अपेक्षित निकाल न मिळाल्यानंतर भाजप धुरिणांनी विविधांगी मंथन केले व संघाची साथ किती महत्त्वाची आहे हे पक्षश्रेष्ठींना पटवून दिले. त्यानंतर काही महिन्यांतच झालेल्या महाराष्ट्र निवडणुकीत संघ पदाधिकाऱ्यांच्या नियोजनाचा प्रभाव दिसून आला होता. मागील जवळपास ११ वर्षांत नागपुरात येऊनही पंतप्रधान एकदाही संघस्थानी न गेल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र वर्षप्रतिपदेच्या दिवशी मोदी यांनी संघस्थानी येत कृती व वाचेतून संघ-भाजपमध्ये ‘ऑल इज वेल’ असल्याचा संदेशच दिला. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खोचक शब्दांत टीका केली.
खूर्ची धोक्यात आल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना RSSची आठवण आली असावी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ वर्षानंतर ३० मार्च रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील मुख्यालयाला भेट दिली. आपली खूर्ची धोक्यात आल्यामुळेच नरेंद्र मोदी यांना आरएसएसची आठवण आली असावी, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. दुसरीकडे, शताब्दी वर्षात संघाकडून पंच परिवर्तनाच्या बिंदूंवर काम सुरू झाले असून त्यात सामाजिक समरसतेचा प्रमुख मुद्दा आहे. पंतप्रधानांनी संघभूमीत नमन केल्यानंतर काही मिनिटांतच दीक्षाभूमी गाठून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेतले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरच्या रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती स्थळाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांचीही भेट घेतली. या कार्यक्रमावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीचा मुद्दा छेडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः एक नियम केला आहे. त्यांच्या पक्षात ७५ वर्षे झाल्यानंतर सत्तेच्या पदावर कुणी राहू नये हा त्यांचा नियम आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशींसह अनेक प्रमुख नेत्यांना तो नियम लागू केला. या नियमाच्या पलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्या नियमाची मान्यता होती. त्यासाठीच ते चर्चा करण्यासाठी गेले होते. १७ सप्टेंबरला पंतप्रधान मोदी ७५ वर्षे पूर्ण करत आहेत. त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावे लागते. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीत. त्यांना कितीही बोलू द्या, असे राऊत म्हणालेत.