“वक्फ कायद्यानंतर भाजपाचा पद्मनाभ मंदिरातील सोन्यावर डल्ला मारण्याचा डाव”; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 21:26 IST2025-04-06T21:22:58+5:302025-04-06T21:26:46+5:30

Congress Harshwardhan Sapkal News: भाजपाला खरेच छत्रपतींबद्दल अभिमान असेल तर कोरटकर, सोलापूरकरवर कठोर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली आहे.

congress harshwardhan sapkal criticizes bjp over waqf board amendment bill act | “वक्फ कायद्यानंतर भाजपाचा पद्मनाभ मंदिरातील सोन्यावर डल्ला मारण्याचा डाव”; काँग्रेसची टीका

“वक्फ कायद्यानंतर भाजपाचा पद्मनाभ मंदिरातील सोन्यावर डल्ला मारण्याचा डाव”; काँग्रेसची टीका

Congress Harshwardhan Sapkal News: देशात महागाई प्रचंड वाढलेली आहे, मराठी शाळा बंद होत आहेत, रोजगार नाहीत पण केंद्र सरकारने एक खेळणे हाती दिले असून आपण हातावर हात ठेवून पाहत बसलो आहोत, ते म्हणजे वक्फ बोर्ड. इंग्रजांनी दिल्लीत राजधानी वसवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी भू संपादन करताना प्रार्थना स्थळे सुरक्षित रहावीत अशी मागणी झाली, त्यासाठी १९१३ साली पुनर्वसनासाठी बनवलेल्या कायद्यातून वक्फ बोर्ड बनले. सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे सुरक्षित रहावित यासाठी ते बनवले होते, त्यात मंदिर, मशीद, गुरुद्वारा यांना विशेष अधिकार दिले होते. वक्फ सुधारणा विधेयक पास करून जमीन ताब्यात घेण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असला तरी याच्याआडून पद्मनाभ मंदिरातील प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेल्या सोन्यावर त्यांना डल्ला मारायचा आहे आणि त्यासाठीच हा सर्व खेळ सुरू आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. 

नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला, यावेळी मेळाव्याला संबोधित करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी भाजपावर निशाणा साधला. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकरच्या घराला पोलीस संरक्षण दिले जाते. प्रशांत कोरटकरने महाराजांचा अपमान केला. आता त्याच्यावर कारवाईचे नाटक सुरू आहेत, पण या प्रवृत्तींना कोणाचे पाठबळ आहे ते सर्वांना माहित आहे. गोलवलकर यांच्या ‘बंच ऑफ थॉट’ या पुस्तकातही छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अत्यंत खालच्या स्तरावरील लिखाण केलेले आहे. आता भाजपाचा कोणी केंद्रीय मंत्री रायगडाला भेट देणार आहे, असे समजले. भाजपाला जर खरेच छत्रपतींबद्दल अभिमान असेल तर  कोरटकर, सोलापुरकरवर कठोर कारवाई करा आणि ‘बंच ऑफ थॉट’वर बंदी घाला, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम हे सर्वांचे आहेत, ते भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग आहेत

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम हे सर्वांचे आहेत, ते भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग आहेत. राम नवमीनिमित्त काळाराम मंदिरात जाऊन प्रभू रामाचे दर्शन घेतले व “देशात व राज्यात समतेचा, बंधुत्वाचा व संविधनाचा विचार नांदावा”, अशी कामना व्यक्त केली. या काळाराम मंदिराला मोठा इतिहास आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी १९३० ते १९३५ अशी पाच वर्ष १७ दिवस सत्याग्रह केला पण त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला. यावेळी दंगल होऊन त्यात बाबासाहेब आंबेडकर जखमी झाले होते. दुसऱ्या वर्षी ते गोलमेज परिषदेला गेले असता दादासाहेब गायकवाड, साने गुरुजी यांनी सत्याग्रहाची धुरा सांभाळली पण पाच वर्ष सत्याग्रह करूनही त्यावेळच्या व्यवस्थेने त्यांना प्रवेश दिला नव्हता. त्यामुळे त्यांनी धर्मांतर केले होते. तत्कालीन व्यवस्थेने मंदिराचे चारही दरवाजे बंद करून बाबासाहेबांना प्रवेश नाकारला होता. विद्यमान सरकारही गोरगरीब बहुजनांचे सगळे दरवाजे बंद करून त्यांची विकासाची प्रगतीची संधी हिरावून घेत आहे, या शब्दांत हर्षवर्धन सपकाळ यांनी निशाणा साधला.

दरम्यान, नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातील प्रवेशासाठी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलन केले होते पण तत्कालीन व्यवस्थेने त्यांना मंदिर प्रवेश नाकराला होता. आज रामनवमीचे औचित्य साधत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भारताचा नागरिक या नात्याने बाबासाहेबांनी लिहिलेले पवित्र संविधान हाती घेऊन काळाराम मंदिरात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड, खा. शोभा बच्छाव व शेकडो कार्यकर्त्यांनी प्रभू रामाचे दर्शन घेतले.

 

Web Title: congress harshwardhan sapkal criticizes bjp over waqf board amendment bill act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.