Congress Harshwardhan Sapkal News: नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरातील प्रवेशासाठी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलन केले होते पण तत्कालीन व्यवस्थेने त्यांना मंदिर प्रवेश नाकराला होता. आज रामनवमीचे औचित्य साधत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भारताचा नागरिक या नात्याने बाबासाहेबांनी लिहिलेले पवित्र संविधान हाती घेऊन काळाराम मंदिरात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड, खा. शोभा बच्छाव व शेकडो कार्यकर्त्यांनी प्रभू रामाचे दर्शन घेतले.
राम नवमी निमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराचे महंत तसेच काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात डॉ आंबेडकर यांच्या सोबत असलेले कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड उपस्थित होते. १९३० साली मंदिरात प्रवेशापासून बाबासाहेबांना आणि दादासाहेबांना अडवले होते. पण महंतांनी दादासाहेबांचे नातू कॅप्टन कुणाल गायकवाड यांचे मंदिरात स्वागत केले. यावेळी सपकाळ यांनी महंतांना भारतीय संविधानाची प्रत भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम हे सर्वांचे आहेत, ते भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग आहेत.
देशात व राज्यात समतेचा, बंधुत्वाचा व संविधनाचा विचार नांदावा
राम नवमीनिमित्त काळाराम मंदिरात जाऊन प्रभू रामाचे दर्शन घेतले व “देशात व राज्यात समतेचा, बंधुत्वाचा व संविधनाचा विचार नांदावा”, अशी कामना व्यक्त केली. या काळाराम मंदिराला मोठा इतिहास आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी १९३० ते १९३५ अशी ५ वर्ष १७ दिवस सत्याग्रह केला पण त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला. यावेळी दंगल होऊन त्यात बाबासाहेब आंबेडकर जखमी झाले होते. दुसऱ्या वर्षी ते गोलमेज परिषदेला गेले असता दादासाहेब गायकवाड, साने गुरुजी यांनी सत्याग्रहाची धुरा सांभाळली पण पाच वर्ष सत्याग्रह करूनही त्यावेळच्या व्यवस्थेने त्यांना प्रवेश दिला नव्हता. त्यामुळे त्यांनी धर्मांतर केले होते. तत्कालीन व्यवस्थेने मंदिराचे चारही दरवाजे बंद करून बाबासाहेबांना प्रवेश नाकारला होता. विद्यमान सरकारही गोरगरीब बहुजनांचे सगळे दरवाजे बंद करून त्यांची विकासाची प्रगतीची संधी हिरावून घेत आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापुरकरच्या घराला पोलीस संरक्षण दिले जाते, प्रशांत कोरटकरनेही महाराजांचा अपमान केला आता त्याच्यावर कारवाईचे नाटक सुरु आहे पण या प्रवृत्तींना कोणाचे पाठबळ आहे ते सर्वांना माहित आहे. भाजपाला जर खरेच छत्रपतींबद्दल अभिमान असेल तर कोरटकर, सोलापूरकरवर कठोर कारवाई करा आणि ‘बंच ऑफ थॉट’वर बंदी घाला, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.