“आघाडीच्या राजकारणाने मर्यादा, आता कोकणात पक्ष मजबूत करण्याकडे लक्ष”; काँग्रेसचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 17:02 IST2025-03-16T17:01:46+5:302025-03-16T17:02:00+5:30

Congress Harshwardhan Sapkal Ratnagiri News: आघाड्या, युतीच्या अपरिहार्यतेची किंमत काँग्रेसने मोजलेली आहे. आघाडीमुळे कोकणात निवडणुका लढवता आल्या नाहीत आता रडायचे नाही तर लढायचे आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी स्थानिक पातळीवर काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

congress harshwardhan sapkal said that aghadi politics has its limits now focus on strengthening the party in konkan | “आघाडीच्या राजकारणाने मर्यादा, आता कोकणात पक्ष मजबूत करण्याकडे लक्ष”; काँग्रेसचा निर्धार

“आघाडीच्या राजकारणाने मर्यादा, आता कोकणात पक्ष मजबूत करण्याकडे लक्ष”; काँग्रेसचा निर्धार

Congress Harshwardhan Sapkal Ratnagiri News: तळकोकणात सामाजिक सौहार्द बिघडवून येथील शांतता नष्ट करण्याचा सत्ताधारी लोकांचा डाव आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात खनिजे सापडली आहेत, ती उद्योगपतींना द्यायची आहेत. कोकणातील माणूस स्वाभिमानी आहे त्याचा अडसर यात येऊ नये म्हणून जातीय व धार्मिक मुद्द्यांवरून वातावरण अशांत करून त्यांना त्यांचा कुटील हेतू साध्य करायचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस संघटना मजबूत करण्याची गरज आहे. महिनाभरात स्थानिक लोकांशी चर्चा करुन निर्णय घेतले जातील. आता रडायचे नाही तर लढायचे आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी स्थानिक पातळीवर काम करा, प्रदेश काँग्रेस तुमच्या पाठीशी आहे, असे गॅरंटी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.

रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सिंधुदुर्गचे पालकमंत्री रोज बेताल वक्तव्य करून राज्यातील शांतता व सौहार्दाला छेद देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कायदा सुव्यवस्था बिघडली आहे, कोकण व मुंबईचा घनिष्ठ संबंध आहे. कोकणातील मराठी बाणा बिघडवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. कोकणात विपुल प्रमाणात खनिज सापडले आहे ते उद्योगपतींना द्यायचे आहे आणि याप्रकरणी कोकणातील माणूस आडवा येऊ नये म्हणून जाती धर्मात तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्ताधारी फक्त उद्योगपतींच्या हितासाठी कोकण उद्धवस्थ करू पहात आहे. शक्तीपीठ सुद्धा उद्योगपतींच्या फायद्यासाठीच केला जात आहे. बहुजन समाजातीला लोकांना गोव्याला तीर्थ पिण्यास पाठवायचे आणि उद्योगपतींना आयात निर्यात मोठ्या प्रमाणात करता यावी यासाठी हा शक्तिपीठाचा घाट घातला जात आहे, असा दावा सपकाळ यांनी केला.

आघाडीच्या राजकारणाने मर्यादा, आता कोकणात पक्ष मजबूत करण्याकडे लक्ष

देशाच्या व राज्याच्या राजकारणात आघाड्या, युतीची अपरिहार्य आहे, त्याची किंमत काँग्रेसने मोजलेली आहे. युती, आघाडीमुळे कोकणात काँग्रेस निवडणुका लढू शकली नाही. इंडिया आघाडी वा मविआ म्हणून काम करत असताना काही मर्यादा व अडचणी येणे स्वाभाविक आहे. आता कोकणातही पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. सिंधुदुर्गपासून या कामाला सुरुवात झालेली आहे आणि कोकणातही काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जाणार आहेत, असा निर्धार प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

दरम्यान, राज्यातील भाजपा महायुती सरकारने आश्वासन देऊनही शेतमालाला भाव दिला नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. लाडक्या बहिणीच्या मतांवर सत्तेत आले पण सत्तेत आल्यानंतर १० लाख बहिणींना लाभापासून वंचित ठेवले आहे. आश्वासन देऊन न पाळणे हे सरकारचे अपयश आहे. भाजपा युती सरकार मस्तीत चालले असून मंत्र्यांमध्ये बेबनाव आहेत, सत्तापिपासू वृत्तीची माणसे सत्तेत आहेत. गँग्ज ऑफ वासेपूर सारखे हे टोळयांचे सरकार असून त्याची किंमत मात्र जनतेला चुकवावी लागत आहे, अशी टीकाही सपकाळ यांनी केली.

 

Web Title: congress harshwardhan sapkal said that aghadi politics has its limits now focus on strengthening the party in konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.