मुंबई : अकोला लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने सोमवारी रात्री डॉ. अभय पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. डॉ. पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. वंचित आघाडी मविआमध्ये सहभागी झाली नाही तर डॉ. अभय पाटील हे काँग्रेसचे उमेदवार असतील, असे वृत्त 'लोकमत'ने यापूर्वीच दिले होते.
महाविकास आघाडीबरोबर आंबेडकरांच्या मागील दीड महिन्यापासून जागावाटपाबाबत वाटाघाटी सुरू होत्या. महाविकास आघाडीने आधी चार आणि नंतर सहा जागांचा प्रस्ताव आंबेडकरांसमोर ठेवला होता. मात्र, आपल्याला किती जागा हव्यात याबाबत आंबेडकरांनी भूमिका न मांडता महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करत थेट आपले उमेदवार जाहीर केले. आधी सात आणि नंतर स्वतःची अकोल्यातून उमेदवारी जाहीर करत एकूण २० उमेदवार आतापर्यंत ‘वंचित’ने जाहीर केले आहेत. हे उमेदवार जाहीर करताना कोल्हापूर, नागपूरसह सात जागांवर आपण काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचेही आंबेडकरांनी जाहीर केले.
आंबेडकरांनी सात जागांवर पाठिंबा दिल्यानंतर प्रदेश काँग्रेसनेही आंबेडकरांना अकोल्यात पाठिंबा देण्याबाबतचा प्रस्ताव दिल्लीला पाठवला होता. मात्र, दिल्लीतून सोमवारी थेट डॉ. अभय पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली.
२०१९ मध्येही रिंगणातडॉ. अभय पाटील यांना काँग्रेसने २०१९ मध्येही उमेदवारी जाहीर केली होती. डॉ. पाटील तेव्हा शासकीय सेवेत वैद्यकीय अधिकारी होते.निवडणूक लढवण्यासाठी शासकीय सेवेचा राजीनामा द्यावा लागतो. डॉ. पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजीनामाही दिला होता.मात्र, शासनाने तेव्हा त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही आणि त्यांना उमेदवारी जाहीर होऊनही निवडणूक लढवता आली नव्हती.