एकनाथ शिंदे शिवसेना गट आणि उद्धव ठाकरे गटामध्ये या लोकसभेला खरी स्पर्धा रंगली होती. यात उद्धव ठाकरे गटाला जरी जास्त जागा मिळालेल्या असल्या तरी दोघांमधील आकड्यात खूप मोठा फरक नाही. यावरून आता खरी शिवसेना कोणाची हा मुद्दा विधानसभेलाच सोडविला जाणार आहे. अशातच शिंदे गटाने ठाकरे गटाला टोले लगावण्यास सुरुवात केली आहे.
दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा आम्ही कुठे कमी पडलो यावर आम्हाला विचार करावा लागेल. कधी कधी जागा उशिराने जाहीर झाल्याने एखाद्या उमेदवाराला कमी प्रचाराला वेळ मिळतो. बाकींच्यांच्या तुलनेत आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उबाठा गटासाठी योग्य काम केले नाही. यावर त्यांना चिंता करावी लागेल. मी आता पुष्पगुच्छ घेऊन राहुल गांधी यांना भेटायला जाणार, असल्याचा टोला आमदार संजय शिरसाट यांनी लगावला आहे.
जो सेट बॅक झाला आहे तो आम्ही विधानसभेत भरून काढू असे सांगतानाच कोणी ऑब्जेक्शन घेण्याचे कारण नाही. आम्ही तर वर्षा गायकवाड यांच्या जागेवर पण ऑब्जेक्शन घेऊ शकलो असतो. कारण निकम यांची लीड ५० हजार पेक्षा जास्त होती. ती तुटली. आम्हाला ओव्हर कॉन्फिडन्सचा फटका बसला आहे. शिवसेना प्रमुखांना जो झेंडा संभाजीनगर नगरमध्ये पाहिजे होता ते आम्ही फडकुन दिला आहे, असे शिरसाट म्हणाले.
संजय राऊत एक राष्ट्रीय नेते आहेत. ते कोणत्या मतदारसंघातून निवडून आले? दिल्लीमध्ये NDA चे सरकार येणार आणि मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. काँग्रेस आता जिवंत झाली आहे. मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत. जे इतरांना नावे ठेवत होते त्यांच्या आता दिल्ली वाऱ्या सुरु होणार आहेत, असा टोला शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता लगावला.