Congress Hiraman Khoskar News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तसेच अनेक दावे-प्रतिदावेही केले जात आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील नाराजीही हळूहळू समोर येताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे. यातच काँग्रेसमधील एका आमदाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे. तसेच काँग्रेसमधूनच उमेदवारीसाठी आग्रही असणार आहे, असे म्हटले आहे.
मीडियाशी बोलताना काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितले की, १०० टक्के मी काँग्रेसमधूनच उमेदवारी घेणार आहे. स्थानिक काँग्रेसची नेते मंडळी, काँग्रेसचे कार्यकर्ते, आघाडीचे तीनही पक्ष ठरवून मला उमेदवारी द्यायची की नाही, याबाबत ठरवतील. निवडून आणणारे स्थानिक लोक आहेत. त्यामुळे त्यांचा निर्णय माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मला उमेदवारी दिली नाही तर स्थानिक लोक निर्णय घेतील, असे हिरामण खोसकर यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवमाणूस आहे
नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील काही व्यावसायिकांची दुकाने, हॉटेल आहेत. ते हटविण्याचे काम सुरू आहे. एमएमआरडीएचा एक अधिकारी आला, तो जाणूनबुजून हे हटविण्याचे काम करत आहे. स्थानिकांवर अन्याय केला जात आहे. ३५० कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवमाणूस आहे. माझे काम लगेच ऐकले, असे आमदार खोसकर म्हणाले.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची काही मते फुटल्याचे सांगितले जात आहे. या फुटीर आमदारांविरोधात पक्ष कारवाई करणार असल्याची चर्चा सुरू आहे. यामध्ये हिरामण खोसकर यांचे नाव घेतले जात आहे. परंतु, पक्षाविरोधात काम केले नाही. पक्षाने जसे सांगितले होते. जसा प्राधान्यक्रम देण्याचे ठरले होते. त्याचप्रमाणे आम्ही केले. आजपर्यंत काँग्रेसचेच काम केले आहे. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्याने पक्षातील अनेक जण नाराज आहेत, असे हिरामण खोसकर यांनी म्हटले होते.