१८ जानेवारीपासून काँग्रेस एक्शन मोडमध्ये; लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती ठरवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 03:35 PM2024-01-16T15:35:57+5:302024-01-16T15:36:33+5:30
महाविकास आघाडीत अद्याप जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत जागावाटपाचे चित्र स्पष्ट होईल असं सांगण्यात येत आहे.
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात राज्यात काँग्रेसनेही पुढाकार घेतला आहे. येत्या १८ जानेवारीपासून राज्यातील सर्व विभागात काँग्रेसनं बैठकांचे आयोजन केले आहे. विदर्भातील अमरावती येथून या बैठकांना सुरूवात होणार आहे.
नवनियुक्त प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली या बैठका होत असून विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य चंद्रकांत हंडोरे, आ. यशोमती ठाकूर, आ. प्रणिती शिंदे, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, बसवराज पाटील, आ. कुणाल पाटील, राज्यातील माजी मंत्री, जिल्हा अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दोन सत्रात या बैठका होणार आहेत. विभागीय बैठक सकाळी १० ते दुपारी १ वाजेदरम्यान व दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत होणार आहेत.
अमरावती विभागाची बैठक अमरावती यथे दिनांक १८ जानेवारी रोजी, नागपूर विभागाची बैठक गडचिरोली येथे दिनांक २० जानेवारी रोजी, पश्चिम महाराष्ट्राची बैठक पुणे येथे दिनांक २३ जानेवारी रोजी, कोकण विभागाची बैठक भिवंडी येथे २४ जानेवारी रोजी, उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक धुळे येथे २७ जानेवारी रोजी तर मराठवाडा विभागाची बैठक लातूर येथे दिनांक २९ जानेवारी रोजी होणार आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीत अद्याप जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत जागावाटपाचे चित्र स्पष्ट होईल असं सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्येक पक्ष जास्तीत जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे. ठाकरे गटाने २३ जागांची मागणी केली आहे. तर शरद पवार गटानेही १०-१२ जागा लढवण्याची तयारी केली. त्यात वंचित बहुजन आघाडीलाही महाविकास आघाडीत घेण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे मविआचे जागावाटप कधी होणार अशीच चर्चा इच्छुकांमध्ये रंगली आहे.