मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील सर्व 288 जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर आपणही कुठे मागे नसल्याचे दाखवत आता काँग्रेसनेही सर्व ठिकाणच्या इच्छुकांच्या मुलाखती टिळक भवनात रविवारी घेण्याचे ठरविले आहे.
काँग्रेसच्या वाटय़ाला असलेल्या 174 मतदारसंघांमधील इच्छुकांच्या मुलाखती अलीकडेच झाल्या. आता उद्या राष्ट्रवादीच्या कोटय़ातील 114 मतदारसंघांतील काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती होतील. या मुलाखती केवळ औपचारिक नसून आधीच्या मुलाखतींसारखेच गांभीर्य त्यात असेल, असे निवड मंडळाचे अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
विद्यमान आमदारांना संधी
काँग्रेसच्या विद्यमान बहुतेक आमदारांना पुन्हा लढण्याची संधी दिली जाणार आहे. 95 टक्के आमदारांना रिंगणात उतरविले जाईल, असे ठाकरे म्हणाले. काँग्रेसचे आमदार असलेल्या मतदारसंघांची चर्चा ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील निवड मंडळाने अद्याप केलेली नाही. त्यासाठी रविवारी सायंकाळी स्वतंत्र बैठक होणार आहे. काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ 1 सप्टेंबरला येथील हुतात्मा चौकातून होणार आहे. जिल्ह्याजिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, प्रमुख कार्यकर्ते प्रचाराच्या मशाली घेऊन निघतील.
चार विभागांतील
उमेदवारांचे पॅनेल ठरले
1प्रदेश काँग्रेसच्या निवड मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत विदर्भ, मराठवाडय़ातील 75 जागांसाठीचे उमेदवारांचे पॅनेल ठरविण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील 49 मतदारसंघांमधील उमेदवारांचे पॅनेल 27 तारखेच्या बैठकीत ठरले होते.
2मुंबई आणि कोकणमधील इच्छुकांचे पॅनेल निश्चित करण्यासाठीची बैठक रविवारी सकाळी होणार आहे. एकेका मतदारसंघात दोन किंवा तीन नावांची शिफारस केंद्रीय समितीला केली जाणार आहे.
3केंद्रीय समितीची पहिली बैठक रविवारी मुंबईत होईल, असे प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी सांगितले. आजच्या बैठकीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणो आदी उपस्थित होते.