कराड
जवळपास २२ वर्षानंतर काँग्रेस पक्षात अध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे ही अत्यंत समाधानाची बाब आहे. लोकशाही गावागावात रुजविणारा काँग्रेस हा देशातील एकमेव पक्ष असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आमदिर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आज माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीच्या मुंबई येथील टिळक भवन या राज्य मुख्यालयात मतदान केले. मतदान केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
पत्रकात चव्हाण यांनी म्हटले आहे की, पक्षाच्या घटनेनुसार निवडणूक होऊन अध्यक्ष निवडला जावा या प्रमुख मागणीसाठी माझ्या सहित प्रमुख २३ नेत्यांनी आमच्या नेत्या सोनिया गांधी यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन पक्ष संघटनेसाठी व पक्षाची प्रतिमा जनमानसात रुजावी यासाठी काही प्रमुख मागण्याचे सादरीकरण ऑगस्ट २०२० रोजी केले. त्यावर चर्चा केली. त्यावेळी या बैठकीत राहुल गांधी व प्रियांका गांधी सुद्धा उपस्थित होत्या. कोविड मुळे मागण्यांची अंमलबजावणी पक्षाकडून होण्यास जवळपास २ वर्षे लागली. परंतु आज त्यानुसार पक्षात निवडणूक होऊन अध्यक्ष निवडला जात आहे याचे समाधान आहे.
राहुल गांधी पक्षाचा सुपरिचित असा चेहरा आहे व त्यांनीच अध्यक्ष व्हावे अशी आमची मागणी होती. पण त्यासाठी निवडणूक होऊन त्यांनी पद घेतले जावे असे आम्हाला वाटतं होते. परंतु त्यांनी अनेकदा स्वतःच जाहीर केले की गांधी कुटुंबियांतील कोणीही पक्षाचा अध्यक्ष होणार नाही. व त्या मागणीचा आम्ही आदर करीत सद्याच्या होणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीत आम्ही सहभागी झालो.
ही निवडणूक आज देशभरात पार पडली. देशभरात सुमारे ९८०० प्रदेश काँग्रेस कमिटी प्रतिनिधी मतदान देण्यास पात्र होते. यापैकी महाराष्ट्रातून जवळपास ५६१ प्रदेश प्रतिनिधी यांनी मुंबई येथे टिळक भवन या पक्षाच्या राज्य मुख्यालयात मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात जवळपास ९६% प्रदेश प्रतिनिधीनी मतदान केले अशी माहितीही चव्हाण यांनी दिली आहे.