लोकमत न्यूज नेटवर्कदेगलूर (जि. नांदेड) : भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत काॅंग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर ४१ हजार ९३३ मताधिक्य घेऊन विजयी झाले. त्यांनी भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांचा दणदणीत पराभव केला.
मतमोजणीच्या ३० फेऱ्या झाल्या. यामध्ये अंतापूरकर यांना १ लाख ०८ हजार ७८९ तर सुभाष साबणे यांना ६६ हजार ८७२ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम इंगोले यांना ११ हजार ३४७ मतांवर समाधान मानावे लागले. टपाली मतदानातही अंतापूरकर यांनी आघाडी घेतली. त्यांना ५१ तर सुभाष साबणे यांना ३५ मते मिळाली.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच अंतापूरकर आघाडीवर होते. ही आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम राखली. देगलूर आणि बिलोली तालुक्यातही अंतापूरकरांना मताधिक्य मिळाले. ३० फेऱ्यापैकी १० फेऱ्या बिलोली तालुक्यातील होत्या. बिलोली तालुक्यात अंतापूरकर यांना १० हजार ९६९ मतांची आघाडी मिळाली. तर देगलूर तालुक्यात सुमारे ३० हजार ९६७ मतांचे मताधिक्य त्यांना मिळाले. एकूणच ही निवडणूक एकतर्फी ठरली. यानिमित्ताने अनेकांचे अंदाज चुकले.
मिळालेली मतेजितेश अंतापूरकर (काँग्रेस) - १,०८,७८९सुभाष साबणे (भाजप)- ६६,८७२