Rahul Gandhi to Meet Uddhav Thackeray: गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. लवकरच राहुल गांधी मुंबईत दौऱ्यावर येतील आणि मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतील, असे सांगितले जात होते. मात्र, आधी उद्धव ठाकरे दिल्लीवारी करत सोनिया गांधी तसेच काँग्रेस नेत्यांची भेट घेतील. मगच राहुल गांधी मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटतील, असे सांगितले जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि ठाकरे गटात सावरकर मुद्द्यांवरून वाद होता. मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे राहुल गांधींना इशारा दिला. त्यानंतर काँग्रेसनेही सामंजस्याची भूमिका घेत सावरकर मुद्दा घेणार नसल्याचे सांगितले. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेटही घेतली होती. तर शरद पवार यांनीही याबाबत स्पष्ट शब्दांत भाष्य केले होते. त्यानंतर काँग्रेसचे महासचिव के. सी वेणुगोपाळ यांच्यासह राज्यातील नेत्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
मगच निश्चितच राहुल गांधी मातोश्री गाठतील
उद्धव ठाकरे यांनी आधी दिल्ली गाठावी. त्यानंतरच राहुल गांधी मुंबईत येतील, असे काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणूगोपाल यांनी स्पष्ट केल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या १० दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी ‘मातोश्री'वर येणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचे म्हटले जात आहे. वेणूगोपाल यांना राहुल गांधी यांच्या मातोश्री भेटीबाबत विचारले असता, त्यांनी इतक्यात ही भेट होण्याची शक्यताच नसल्याचे सूचित केले. आम्ही उद्धव ठाकरे यांना दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या भेटीसाठी यावे. तसे निमंत्रण आम्ही त्यांना दिले आहे. त्यांची दिल्लीवारी झाल्यावर राहुल गांधी निश्चितच मुंबई गाठतील, अशा आशयाचे विधानही वेणूगोपाल यांनी केले.
दरम्यान, देशात 'मी'करणाच्या विरोधात एक समीकरण बनतंय. म्हणून सर्व पक्ष एकत्र प्रत्येक पक्षाचे स्वतः ची विचारधारा आहेच. त्यालाच लोकशाही म्हणतात म्हणून आम्ही एकत्र आलोय. निवडणुका समोरच उभ्या आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे. भाजपचे अध्यक्ष नड्डा बोललेले फक्त भाजप राहील इतर सगळे पक्ष संपतील. शिवसेना संपवावी यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. भाजपला सत्तेचा हव्यास सत्ताभक्षक झाले आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी शिवसेना संपूर्ण ताकदीने उतरली आहे. विरोधी पक्षांची चर्चा होतच असते. आम्ही मैत्री करतो तर पूर्ण मनापासून निभवतो एक नाते निर्माण होतो. भाजपासोबत २५-३० वर्ष होतो पण होतो पण त्यांना किंमत नव्हती पण ठिक आहे त्यांना मित्र आणि शत्रू समजले नाहीत. लोकांच्या मनात प्रश्न आहेत ते आपल्याला साथ देतील. आमच्या भेटीगाठी सुरु राहतील, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"