Maha Vikas Aghadi Congress Vs NCP News: मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद कोणाकडे असेल, यावरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील नेते विरोधी पक्षनेते पदाबाबत दावे-प्रतिदावे करताना दिसत आहेत. यातच आता अमोल मिटकरी यांचा संजय राऊत झाल्याशिवाय राहणार नाही, अशी बोचरी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
विधान परिषदेत आता बरोबरीचे संख्याबळ आहे. जर महाविकास आघाडीने ठरवून निर्णय घेतला. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असावे. भाजपला वेठीस धरायचे असेल आणि त्यांची कोंडी करायची असेल, तर एकनाथ खडसे हे अभ्यासू नेते आहेत. त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात यावी, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. यानंतर आता काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी अमोल मिटकरी यांच्यावर सडकून टीका केली आहे.
…तर अमोल मिटकरींचा संजय राऊत झाल्याशिवाय राहणार नाही
अमोल मिटकरी यांच्या अशा वक्तव्यामुळेचा त्यांचेही संजय राऊत होईल. विरोधी पक्ष नेता कोण असेल? याचा निर्णय संख्याबळावर होत असतो. विधान परिषदेत राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे नऊ, नऊ जागा होत्या. मनीषा कायंदे शिंदे गटात गेल्याने त्यांच्या जागा कमी झाल्या. परंतु यासंदर्भातील निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. त्यामध्ये इतरांनी लुडबुड करु नये. अमोल मिटकरी यांनी आता कुठेतरी थांबले पाहिजे. त्यांच्यात उद्याचा संजय राऊत दिसत आहे. मिटकरी यांनी योग्य ठिकाणी योग्य वेळी थांबले तर ते महाराष्ट्रात नेते म्हणून परिचत होतील अन्यथा त्यांचा संजय राऊत झाल्याशिवाय राहणार नाही, या शब्दांत कुलकर्णी यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, एसटी विलनीकरण, मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षण बद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते. पण ते आता विसरले आहेत. पुढील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यासाठी पक्षातील, विरोधी पक्षातील अडथळे दूर करण्याचे काम भाजप करत आहे. राज्यातील १८ मंत्री निष्क्रिय असून पाच मंत्री बदलले जातील अशा चर्चा मागील काही दिवसापासून सुरू आहेत. या निष्क्रिय लोकांवर चादर घालण्याचे काम करून केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून होत, असा आरोपही कुलकर्णी यांनी केला.