कोल्हापूर : ऐतिहासिक भवानी मंडपामध्ये मशाल प्रज्वलित करून काँग्रेसच्या संघर्षयात्रेला शनिवारी कोल्हापुरातून प्रारंभ झाला. तत्पूर्वी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये केंद्र आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. रॅलीदरम्यान कॉंग्रेसच्या नेत्यांनी दसरा चौकामध्ये सुरू असलेल्या मराठा आणि लिंगायत आरक्षणाला पाठिंबा दिला.
दुपारी साडेबाराच्या सुमारास भवानी मंडपामध्ये कॉंग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी आणि संसदेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,खासदार कुमार केतकर,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जयवंतराव आवळे, कोल्हापूरच्या संघर्षयात्रेचे मुख्य संयोजक सतेज पाटील, प्रकाश आवाडे, मधुकर चव्हाण, नसीम खान, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते मशाला प्रजवलित करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी पावणे अकरावाजता या सर्व नेत्यांचे ताराराणी चौकामध्ये आगमन झाले. कॉंग्रेस झिंदाबादच्या घोषणा, लहरणाचे कॉंग्रेसचे झेंडे यामुळे चौकातील वातावरण कॉंग्रेसमय झाले होते.
महाराणी ताराराणी यांना अभिवादन केल्यानंतर सर्वजण उघड्या गाडीतून पुढे आले आणि त्यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. तेथून रॅली दसरा चौकामध्ये आल्यानंतर शाहू महाराजांना अभिवादन करून मराठा आरक्षण आणि लिंगायत आंदोलनाला या सर्वच नेत्यांनी पाठिंबा दिला. यानंतर करवीरनिवासीनी अंबाबाईचे दर्शन घेऊन सर्वजण मेळाव्याकडे रवाना झाले.
रॅलीमध्ये महापौर शोभा बोंदे्रे, डी. पी. सावंत, हुस्नबाून खलिफे, वीरेंद्र जगताप, रामहरी रूपनवर, सचिन सावंत, बसवराज पाटील, ॠतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, यशवंत हाप्पे, तौफिक मुल्लाणी, राजू वाघमारे, प्रकाश सातपुते, अॅड. गुलाबराव घोरपडे, संध्या घोटणे, दीपा पाटील, दिलीप पवार, प्रविण केसरकर, शारंगधर देशमुख, राहूल माने, राहूल भोसले, पुजा आरडे, प्रा. अनुराधा मांडरे,रूपाली पाटील, वैशाली महाडिक,चंदा बेलेकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविकांसह विविध संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
मराठा समाजाला एकाकी पाडण्याचा डाव
आम्ही सत्तेवर असताना मराठा समाजाला आरक्षण दिले. मात्र नंतर भाजप शिवसेना युती सरकारने केवळ फसवणुकीचा धंदा सुरू केला आहे. मराठा समाजाला एकाकी पाडण्याचा डाव सुरू असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला.
मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देताना ते बोलत होते. आणखी दोन चार महिने टोलवाटोलवी करायची आणि नंतर आचारसंहितेचे कारण सांगून फसवणूक करण्याचाच सरकारचा हेतू आहे. मात्र ही संघर्ष यात्रा तुमचा आवाज बुलंद करेल असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. वसंतराव मुळीक यांनी स्वागत केले तर दिलीप देसाई यांनी आभार मानले.
सरकारकडून सामाजिक दुही निर्माण करण्याचा प्रयत्न
मराठा, लिंगायत, धनगर समाजाला आरक्षण न देता केवळ या समाजांमध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. लिंगायत आरक्षण आंदोलनाला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. सरलाताई पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी संजय मंडलिक, सुर्यकांत पाटील बुध्दिहाळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्त्यांचा उत्साह
मोटारसायकलना कॉंग्रेसचे झेंडे लावून शेकडो कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी झाले होते. धनगरी ढोलांनी चांगलीच वातावरण निर्मिती केली. संघर्षयात्रेसाठी असलेली खास बस आणि दोन उघडी वाहने सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सोनिया गांधी आणि राहूल गांधींच्या विजयाच्या यावेळी घोषणा दिल्या जात होत्या.
अशोक चव्हाण, विखे पाटील यांनी दिल्या घोषणा
दसरा चौकामध्ये मराठा आंदोलनाला पाठिंबा देताना सुरूवातीला अशोक चव्हाण यांनी शाहू महाराज आणि जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा दिल्या. तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी लिंगायत समाजाला पाठिंबा दिला तेव्हा घोषणा दिल्या. यावेळी पुन्हा अशोक चव्हाण यांनी बसवेश्वर महाराज की म्हणत घोषणा दिल्या.