काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात कोरोना पॉझिटिव्ह; ट्विट करून दिली माहिती, जनतेलाही केलं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 10:40 PM2021-12-30T22:40:16+5:302021-12-30T22:40:53+5:30
आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार घेणार आहोत, असे थोरात यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी यावेळी राज्यातील जनतेलाही मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई - महाराष्ट्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वतःच ट्विट करून माहिती दिली आहे. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण पुढील उपचार घेणार आहोत, असे थोरात यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी यावेळी राज्यातील जनतेलाही मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
थोरात यांनी ट्विट करत सांगितले, की "माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला कोणतेही लक्षण नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा आणि काळजी घ्यावी."
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) December 30, 2021
मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.
हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाची लागण -
यापूर्वी, भाजप नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (harshwardhan patil tested corona positive) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी स्वतःच समाज माध्यमाद्वारे माहिती दिली. दोन दिवसांपूर्वीच पाटील यांची मुलगी अंकिता हिचा निहार ठाकरे याच्याशी मुंबई येथे विवाह झाला होता. या विवाह समारंभास राज्यातील अनेक बडे नेत्यांनी हजेरी लावली होती. आता हर्षवर्धन पाटील यांनाच कोरोनाची लागण झाल्याने विवाहसोहळ्यासाठी उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाटील यांनी सुरक्षेच्या दृष्टीने कोरोना चाचणी केली आणि ते पॉझिटिव्ह आले.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरोना चाचणी केली असता ती टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी व काळजी घ्यावी ही विनंती.
— Harshvardhan Patil (@Harshvardhanji) December 30, 2021
तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वतःच सोशल मीडियावरून यासंदर्भात काल माहिती दिली. तसेच, राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनाही कोरोनाची लागण (Corona Virus) झाली आहे. त्यांनीही स्वतःच ट्विट करून आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती दिली होती.