"काकांनी निवृत्त होण्याची वेळ"; आशिष देशमुखांचा गृहमंत्र्यांना घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 01:17 PM2021-02-03T13:17:49+5:302021-02-03T13:19:13+5:30
विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपची साथ सोडत आशिष देशमुखांनी धरला होता काँग्रेसचा हात
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता निवृत्त होण्याची वेळ आली आहे, असं म्हणत त्यांचे पुतणे आशिष देशमुख यांनी घरचा आहेर दिला. "गृहमंत्री हे आपल्या मतदारसंघातून गायब आहेत. गेल्या सव्वा वर्षांमध्ये त्यांच्या मतदारसंघात कोणतीही कामंदेखील झालेली नाहीत. त्यामुळे मी पुन्हा सक्रिय झालो पाहिजे अशी जनतेची आणि कार्यकर्त्यांची मागणी होती. त्यामुळे सामाजिक कार्यक्रम मी आयोजित करत आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी माझा हातभार लागावा हीच एक इच्छा आहे," अशी प्रतिक्रिया आशिष देशमुख यांनी दिली.
"अनिल देशमुख हे औरंगाबादमध्ये कोणाकोणासोबत दिसतायत हे ठाऊक आहे. त्यांनी याबद्दल स्पष्टीकरणही दिलं असेल. परंतु त्यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी आहे," असं आशिष देशमुख म्हणाले. राजकारणाशी माझ्या कार्यक्रमाचा संबंध नसला तरी खऱ्या अर्थानं पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग या वर्षात चालू होण्याची चिन्ह नाहीत. तसंच आमच्या या मतदारसंघात जवळपास ९ हजार विद्यार्थी गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून शिक्षणापासून दूर आहे. ते ड्रॉप आऊट होण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणातून या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक, सामाजिक आणि भावनिक नुकसान होत असल्याचं दिसत आहे आणि हे भरून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.
"राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सर्व मतदार संघात फिरत आहेत. मग ते काँग्रेसचे असो किंवा शिवसेनेचे असो. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याची संधी आहे. आम्ही देशील तोच प्रयत्न करतोय. येत्या काळात काँग्रेस हा पक्षदेखील स्वबळावर राज्यात सत्तेत येईल," असा विश्वास आशिष देशमुख यांनी व्यक्त केला. प्रत्येक व्यक्ती हा निवृत्त होत असतो आता अनिल देशमुख यांची ही वेळ आली असल्याची टीका आशिष देशमुख यांनी केली.
कोण आहेत आशिष देशमुख ?
आशिष देशमुख हे नागपुरातील काटोल विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. परंतु २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकांपूर्वी शिष देशमुख यांनी भाजपाचा हात सोडत काँग्रेसचा हात धरला होता. भाजपत असताना त्यांनी आपले काका अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. परंतु वेगळ्या विदर्भाची मागणी करत आशिष देशमुख यांनी २०१८ मध्ये भाजपला रामराम ठोकला.