सगळ्यांच्या इच्छांची गोळाबेरीज ४८ जागांच्या वर जाईल - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
By शिवराज बिचेवार | Published: December 31, 2023 03:33 PM2023-12-31T15:33:42+5:302023-12-31T15:34:35+5:30
जागा वाटपाचा कोणताही फार्म्युला अद्याप ठरला नाही. पक्षश्रेष्ठी निर्देश देईपर्यंत आम्हाला थांबावे लागणार आहे, असेही चव्हाणांनी स्पष्ट केले.
नांदेड : लोकसभेसाठी संजय राऊत यांची २३ जागांची इच्छा आहे, प्रकाश आंबेडकरांची १२ ते १३, शरद पवार यांचीही काही इच्छा असेल तर काँग्रेसचीही इच्छा आहे. परंतु या सर्व इच्छांची गोळाबेरीज हे ४८ जागांच्या पुढे जाईल. त्यामुळे सगळा हिशोब ४८च्या आत बसवावा लागेल. तो बसविण्यासाठी जिंकण्याची परिस्थिती कोणाची आहे? कोण निवडून येऊ शकतो ही समीकरणे राहणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली.
रविवारी चव्हाण हे नांदेडात होते. ते म्हणाले, दिल्लीत मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली लाेकसभेतील जागाबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेसाठी महाराष्ट्रातून आम्ही चार-पाच नेते होते. यावेळी पक्षश्रेष्ठींनी जागा लढविण्याबाबत विचारपूस केली. कुठे काय परिस्थिती आहे? याची माहिती घेतली. शेवटी ते जो निर्णय घेतील त्याप्रमाणे पुढे जायचे आहे. कोणत्या जागा सोयीच्या आहेत? राजकीय परिस्थिती काय? समीकरणे काय? या सर्व बाबींचा विचार पक्षश्रेष्ठींना निर्णय घेण्यापूर्वी करावा लागतो. मात्र जागा वाटपात बाकीच्या पक्षांशी अद्याप बोलणी व्हायची आहे. जागा वाटपाचा कोणताही फार्म्युला अद्याप ठरला नाही. पक्षश्रेष्ठी निर्देश देईपर्यंत आम्हाला थांबावे लागणार आहे, असेही चव्हाणांनी स्पष्ट केले.