मुंबई - उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका मुलीवर झालेल्या कथित सामूहीक बलात्कार आणि हत्येप्रकरणी यूपी सरकार पहिल्यापासूनच काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे. कुणालाली पीडित कुटुंबाला भेटू दिले गेले नाही. विरोधी पक्षाचे नेते आणि माध्यमांना प्रतिबंध करून योगी सरकार कुणाला तरी वाचविण्याचा आटापीटा करत आहे. हाथरस प्रकरणी योगी आदित्यनाथ सरकारची भूमिका संशास्पद असून हे प्रकरण दाबण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसते, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
हाथरसच्या पीडित मुलीला व तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असून त्याच मागणीसाठी आज राज्यव्यापी सत्याग्रह करण्यात आला. राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने या सत्याग्रहात भाग घेतला.
मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी खा. डॉ. भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, आ. भाई जगताप, आ. अमिन पटेल, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत, यशवंत हाप्पे, भाईजान, सचिव राजाराम देशमुख, झिशान अहमद, नितीन पाटील, मुनाफ हकिम यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, उत्तर प्रदेशातील घटना अमानवीय असून योगी आदित्यनाथ व उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या कृत्याचा निषेध म्हणून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. दलित समाजातील मुलगी आणि त्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न राहुल गांधी आणि प्रियांका गांधी करत असताना उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी ज्या पद्धतीने त्यांना वागणूक दिली ते अत्यंत आक्षेपार्ह व निषेधार्ह आहे. हाथरसचे प्रकरण दाबण्यासाठी भाजपाचे स्थानिक नेते व माजी आमदार आरोपींच्या समर्थनार्थ बैठका घेत आहेत. पोलीस बळाचा वापर करून पीडित कुटुंबाला समाजापासून वेगळे पाडण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी हे प्रकरण अत्यंत निष्काळजीपणे हाताळले आहे. आताही त्यांनी विरोधकांना दंगली घडवायच्या आहेत, असा हास्यास्पद आरोप करून मूळ घटनेवरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपच्या राज्यात दलित, अल्पसंख्याक, महिला यांच्यावर अत्याचार वाढले असून त्यांच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही यामुळे हाथरस प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुप्रीम कोर्टामार्फत करावी आणि हाथरसच्या जिल्हाधिकाऱ्यावर कारवाई करावी या काँग्रेसच्या मागण्या आहेत. काँग्रेस त्या पीडितेला व तिच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी संघर्ष करत असून हा लढा न्याय मिळेपर्यंत सुरूच राहिल, असेही थोरात म्हणाले.
पुणे येथे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह करण्यात आला तर अमरावती येथे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. नांदेड, कोल्हापूर, नाशिक, नागपूर ,बुलढाणा, यवतमाळ, सिधुदुर्ग, रत्नागिरी, लातूर, परभणी, भिवंडी अकोला यांसह राज्यभरातील सर्व जिल्ह्यांत सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.