अर्थसंकल्प हा निवडणुकीचा जाहीरनामा आहे की सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्प पत्र : बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 04:34 PM2021-02-01T16:34:18+5:302021-02-01T16:36:23+5:30

सर्वात जास्त कर देणाऱ्या महाराष्ट्रावर मोदी सरकारकडून अन्याय झाल्याची थोरात यांची टीका

congress leader balasaheb thorat criticize finance minister nirmala sitharaman budger 2021 parliament | अर्थसंकल्प हा निवडणुकीचा जाहीरनामा आहे की सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्प पत्र : बाळासाहेब थोरात

अर्थसंकल्प हा निवडणुकीचा जाहीरनामा आहे की सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्प पत्र : बाळासाहेब थोरात

Next
ठळक मुद्देसर्वात जास्त कर देणाऱ्या महाराष्ट्रावर मोदी सरकारकडून अन्याय झाल्याची थोरात यांची टीकामुंबई, महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून काही मिळालं नाही, थोरात यांचं वक्तव्य

"मोदी सरकारच्या आजच्या अर्थसंकल्पातून ज्या राज्यात निवडणुका आहेत त्याच राज्यात विकास प्रकल्पांची घोषणा करण्याची नवी पद्धत समोर आली आहे. ज्या राज्यात निवडणुका नाहीत त्या राज्यात काही द्यायचेच नाही हे केंद्र सरकारचे धोरण असल्याचे या अर्थसंकल्पातून समोर आले आहे. या सरकारने अर्थसंकल्पाला निवडणूक जाहीरनामा बनवले आहे. अर्थमंत्र्यांचे आजचे अर्थसंकल्पीय भाषण ऐकल्यावर हा निवडणुकीचा जाहीरनामा होता की सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्पपत्र होते, हाच प्रश्न पडला आहे," अशी घणाघाती टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

"देशाच्या इतिहासात अर्थसंकल्पातून पायाभूत विकासाच्या प्रकल्पांची घोषणा व्हायची. सत्तर वर्षात यातून अनेक प्रकल्प उभे राहिले. आजच्या अर्थसंकल्पातून मात्र हे सगळे प्रकल्प विकून आत्मनिर्भर भारताच्या पोकळ घोषणा अर्थमंत्र्यांनी दिल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सरकारांनी उभारलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील नफा कमावणाऱ्या कंपन्या विकण्याचा सपाटाच मोदी सरकारने लावला आहे. मै देश नही बिकने दुंगा असे म्हणणारे मोदी खोटे बोलत होते यावर स्वत: अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणातून शिक्कामोर्तब केले आहे," असंही थोरात म्हणाले. विमानतळ, महामार्ग, वीज वितरण वाहिन्या, रेल्वे मालवाहतूक मार्गाचे काही भाग, शासकीय गोदामे, गेल, इंडियन ऑयलची पाइप लाइन आणि स्टेडियम सरकार विकणार आहे. तसेच देशातील सात बंदरेही खासगी कंपन्यांना दिला जाणार आहेत. देशाची संपत्ती आणि सुरक्षा खासगी कंपन्यांना विकली असल्याचंही ते म्हणाले.

"आजवर एलआयसी ही भारतीय नागरिकांसाठी सुरक्षित गुंतवणुकीचे माध्यम होते. आज एलआयसी विकण्याची घोषणा अर्थसंकल्पात झाली आहे. आपले भविष्य सुखकारक आणि सुरक्षित व्हावे म्हणून एलआयसीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कोट्यावधी लोकांचे भवितव्य यामुळे अंधारात ढकलले आहे. सरकारने नियोजनशून्यरित्या लावलेल्या लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोक बेरोजगार झाले आहेत. छोटे व्यावसायिक देशोधडीला लागले, त्यांना हा अर्थसंकल्प समर्पित असेल अशी अपेक्षा होती. अर्थमंत्र्यांनी त्याबाबत चकार शब्दही काढलेला नाही. जीएसटीचे अवाजवी दर सरकार कमी करेल अशी अपेक्षा होती, मात्र त्या दरातही सरकारने कपात केली नाही. ही सर्वसामान्य गरिबांची मोठी फसवणूक आहे. यामुळे महागाई वाढतच जाणार आहे," असंही थोरात यांनी नमूद केलं.

मोफत लस दिली जाईल अशी अपेक्षा होती

बिहार निवडणुकीच्या प्रचारावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिहारमध्ये भाजपची सत्ता आल्यावर मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली होती. आज अर्थसंकल्पात देशवासीयांना मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली जाईल अशी अपेक्षा होती पण सरकारने देशाची निराशा केली असल्याची टीकाही थोरात यांनी केली. 

मुंबई, महाराष्ट्राला काहीही नाही

महाराष्ट्र आणि मुंबईला या अर्थसंकल्पातून काहीही मिळालेला नाही. देशाच्या विकासात सर्वांत मोठे योगदान देणाऱ्या महाराष्ट्राशी सूडबुद्धीने वागण्याची भूमिका यातून पुन्हा एकदा दिसून आली. कराच्या रूपाने महाराष्ट्र सर्वात जास्त रक्कम केंद्राला देतो पण महाराष्ट्राला मात्र अर्थसंकल्पातून काहीच मिळाले नाही. तर आयकर मर्यादेचा उल्लेख टाळून नोकरदार मध्यमवर्गीयांची घोर निराशा केंद्र सरकारने केली आहे. या अर्थसंकल्पातून शेतकरी, कष्टकरी, कामगार नोकरदार, तरूण, महिला यांच्यासह मध्यमवर्गाचीही घोर निराशा केली आहे, असे थोरात म्हणाले.
 

Web Title: congress leader balasaheb thorat criticize finance minister nirmala sitharaman budger 2021 parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.