लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड :काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात आगमन होणार आहे. या यात्रेचा राज्यातील प्रवास नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातून होणार आहे. काँग्रेस नेत्यांनी यात्रा मार्गाची पाहणी करून रविवारी पत्रकारांशी संवाद साधला.
विविधतेने नटलेल्या भारतासाठी ही ‘भारत जोडो यात्रा’ असून हा एकप्रकारे दुसरा स्वातंत्र्य लढाच आहे, असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह मुक्कामांच्या स्थळांची पाहणी केली.
भाजपचे ‘वंदे मातरम्’ तर काँग्रेसचे ‘जय बळीराजा’
मुंबई : राज्यात ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणावे, असा आदेश शिंदे-भाजप सरकारने काढला आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ‘वंदे मातरम्’ला आमचा विरोध नाही. आपला देश कृषिप्रधान आहे. त्यामुळे अन्नदात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी याच भावनेने ‘जय बळीराजा’ व ‘रामराम’ म्हणावे अशी आमची भूमिका आहे.भारत जोडो यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून भाजपचे नेते बिथरले आहेत. भाजपच्या नेत्यांचे संतुलन बिघडले असून त्याच निराश मानसिकतेतून ते टीका करत आहेत, असेही ते म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"