शरद पवार आणि हार्दिक पटेल यांची मुंबईत भेट; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 15:34 IST2021-03-11T15:32:32+5:302021-03-11T15:34:47+5:30
गुजरातचे काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि युवा नेते हार्दिक पटेल (hardik patel) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतली.

शरद पवार आणि हार्दिक पटेल यांची मुंबईत भेट; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
मुंबई : गुजरातमधील स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर आता गुजरातचे काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि युवा नेते हार्दिक पटेल (hardik patel) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. (congress leader hardik patel meets ncp leader sharad pawar in mumbai)
हार्दिक पटेल मुंबई दौऱ्यावर आहे. शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी हार्दिक पटेल यांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. हार्दिक पटेल आणि शरद पवार यांची ही भेट राजकीय असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. कॉंग्रेसमध्ये हार्दिक पटेल यांच्या नेतृत्व गुणाचा आणि त्यांच्या ऊर्जेचा योग्य वापर केला जात नसल्याचे बोलले जात आहे.
देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील RSS मुख्यालयात; मोहन भागवतांशी दीड तास खलबतं
हार्दिक पटेलने व्यक्त केली खंत
कॉंग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी तसेच प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे हार्दिक पटेल यांनी अनेकदा सांगितले आहे. मात्र, गुजरात काँग्रेस काळासोबत जायला तयार नसल्याची खंत हार्दिक पटेल यांनी व्यक्त केली आहे. आगामी काही दिवसांमध्ये हार्दिक पटेल यांना गुजरातमध्ये मोठी जबाबदारी देणार असल्याचे संकेत असून, या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची भेट राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण अशी मानली जात आहे.
कॉंग्रेसला पुर्नसंजीवनी देण्यासाठी हार्दिक पटेल!
कॉंग्रेसच्या नेतृत्वाच्या संमतीनतंरच हार्दिक पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली, अशी माहिती मिळाली आहे. गुजरात कॉंग्रेसमध्ये पक्षात लागलेली गळती पाहता कॉंग्रेसला पुर्नसंजीवनी देण्यासाठी हार्दिक पटेल यांचे नेतृत्व महत्वाचे मानले जात आहे. शरद पवारांची भेट केवळ राजकारणात मार्गदर्शन घेण्यासाठीची भेट असावी, अशी चर्चा असल्याचे बोलले जात आहे. पक्षात आलेली मरगळ आणि मंदावलेली अवस्था पाहता याठिकाणी मोठे बदल करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून हार्दिक पटेल मुंबईत आहेत. कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांचीही त्यांनी भेट घेतली आहे. हार्दिक पटेल यांच्याकडे देण्यात येणारी मोठी जबाबदारी ही एक पक्षासाठीची मोठी संधी मानली जात आहे.