शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस नेते द्विधा मन:स्थितीत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 06:34 AM2019-11-06T06:34:23+5:302019-11-06T06:34:53+5:30
शिवसेनेला पाठिंबा नाही असे जाहीर केल्यास प्रस्ताव बारगळेल व भाजपसोबत शिवसेना जाईल.
अतुल कुलकर्णी
मुंबई : राष्ट्रवादी व शिवसेनेने सरकार स्थापन करावे आणि काँग्रेसने त्यास बाहेरुन पाठिंबा द्यावा, या प्रस्तावाशी काँग्रेसचे दिल्लीतील नेते तयार नाहीत. त्याचा राष्ट्रवादी-शिवसेना-भाजपला होईल, काँग्रेसला मात्र बळ मिळणार नाही, असे दिल्लीतील नेत्यांचे मत असल्याचे समजते. उत्तर प्रदेशात याआधी काँग्रेसने समाजवादी पक्ष आणि मायावतीच्या बसपा या दोन पक्षांना बाहेरुन पाठिंंबा दिला होता. त्यावेळी काँग्रेसचा जनाधार कमी झाला आणि हे दोन पक्ष वाढले. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. राष्टÑवादी-शिवसेनेचे सरकार आल्यास अनेक काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीकडे वळतील व काँग्रेस दुबळी होईल. शिवाय, हे सरकार किती काळ टिकेल याचीही खात्री नाही. त्यामुळे काँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे.
शिवसेनेला पाठिंबा नाही असे जाहीर केल्यास प्रस्ताव बारगळेल व भाजपसोबत शिवसेना जाईल, असे या नेत्यांना वाटते. त्यामुळे जेवढे ताणता येईल तेवढे ताणून धरायचे अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. आमच्या पक्षात बंडखोरी होणार नाही. एखादा आमदार काँग्रेस, राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेला तर त्याच्या विरोधात एकास एक उमेदवार उभा केला जाईल आणि त्याला पाडू, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार दिल्लीतून येणार आहेत. त्यांची आणि सोनिया गांधी यांची भेट झाली आहे. त्या भेटीची माहिती ते आम्हाला देतील, त्यानंतर चर्चा होईल आणि मग निर्णय घेण्यात येईल. आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. शिवसेनेने प्रस्ताव दिलेला नाही, त्यांचा काही निरोप आला तर तो बैठकीत ठेवला जाईल आणि त्यावर चर्चा करू, असेही पाटील म्हणाले.
शिवसेनेला पाठिंबा द्या; युवा नेत्यांचे मत
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना अथवा राष्टÑवादीकडून सरकार बनविण्यासाठी प्रस्ताव आलाच तर तो मान्य करावा, असे काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांचे मत आहे. विश्वजीत कदम, अमित देशमुख यांची देखील हीच भूमिका आहे, असा दावाही त्यांनी केला.