मुंबई: शिवसेना ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी रविवारी रात्री शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी ठाण्यातील आनंदाश्रम येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनीषा कायंदे यांनी ठाकरे गटाला रामराम केल्यामुळे ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद धोक्यात येण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जागा कमी झाल्या आहेत. ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या ९ झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या देखील ९ आहे.
सध्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. जर राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदावार दावा केल्यास अंबादास दानवे यांचं पद जाऊ शकतं, अशी चर्चा रंगू लागली आहे. याचदरम्यान विधान परिषदेत ज्याचे सदस्य जास्त त्याच्याकडे विरोधी पक्षनेते पद असावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. अमोल मिटकरी यांच्या या विधानावर आता काँग्रेसचे नेते काकासाहेब कुलकर्णी यांनी निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडीतील काही नेत्यांना विनंती आहे, विरोधी पक्ष नेता कोण होईल याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, त्यामुळे आता लुडबुड करण्यात मजा नाही. अमोल मिटकरी यांनी आता कुठंतरी थांबलं पाहिजे. त्यांच्यातला उद्याचा संजय राऊत मला आज दिसत आहे. अमोल मिटकरी यांनी योग्य ठिकाणी योग्य वेळी थांबलं तर ते महाराष्ट्रात नेते म्हणून परिचित होतील, अन्यथा त्यांचा संजय राऊत झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे.
मनीषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतरचं विधान परिषदेतील संख्याबळ पुढील प्रमाणे आहे.
भाजपा- २२ठाकरे गट- ०९शिंदे गट- ०२राष्ट्रवादी काँग्रेस- ०९काँग्रेस- ०८अपक्षइतर- ०७एकूण रिक्त जागा- २१