नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना काँग्रेस नेते आणि माजी मंत्री वसंत पुरके यांचा जीभेवरील ताबा सुटल्याचं जनसंघर्ष यात्रेत पाहायला मिळालं. काँग्रेसची सत्ता आल्यावर मोदींना तुरुंगात टाकू, असं पुरके म्हणाले. मोदींच्या काँग्रेसमुक्त भारत घोषणेचा समाचार घेताना पुरके यांची जीभ घसरली. काँग्रेस मोदींच्या बापाची मालमत्ता नाही, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतानाही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. केंद्र आणि राज्यातील सरकारविरोधात काँग्रेसनं सुरू केलेल्या जनसंघर्ष यात्रेचा पाचवा टप्पा विदर्भात सुरू झाला. यावेळी नागपूरमधील कामठी आणि रामटेकमध्ये काँग्रेसच्या सभा झाल्या. यामधून काँग्रेस नेत्यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना वसंत पुरकेंनी मोदी आणि फडणवीसांवर बोलताना पातळी सोडली. मोदींच्या काँग्रेसमुक्त भारत घोषणेवर टीका करताना त्यांची जीभ घसरली. 'काँग्रेस काही त्यांच्या बापाची मालमत्ता नाही,' असं पुरके म्हणाले. विशेष म्हणजे याआधीच्या जनसंघर्ष यात्रेतील भाषणावेळीही पुरकेंनी असंच वादग्रस्त विधान केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना पुरकेंनी त्यांच्या कुटुंबाबद्दल वादग्रस्त विधानं केली. 'शेकडो महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा बाबा राम रहिम मुख्यमंत्री फडणवीसांना अष्टपैलू वाटतो. त्यामुळे माझा फडणवीसांना एक सल्ला आहे. त्यांनी बाबा राम रहिमला त्यांच्या घरी घेऊन जावं. बाबा तुम्हाला एखादा पैलू दाखवल्याशिवाय राहणार नाही,' असं पुरके म्हणाले. या सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही भाजपा सरकारवर सडकून टीका केली.
'काँग्रेस मोदींच्या बापाची मालमत्ता नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 1:13 PM