- प्रमोद गवळी, नवी दिल्लीविधान परिषदेच्या आठ जागांसाठी उमेदवारी देण्यावरून खलबते सुरू असतानाच राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी गुरुवारी पक्ष उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. या चर्चेनंतर येत्या दोन ते तीन दिवसांत काँगे्रस उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा होईल, असे समजते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ९ डिसेंबर आहे.या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही नावांवर सहमतीची शक्यता आहे. मात्र कोल्हापूर आणि मुंबईच्या जागेबाबतचा वाद कायम राहण्याचे संकेत आहेत. मुंबईतून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्यावरही प्रश्नचिन्ह कायम आहे. राणे निवडणूक लढू इच्छित नसल्याचेही काही गोटांतून ऐकायला मिळत आहे.दुसरीकडे, कोल्हापूर जागेसाठी राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याविरोधात जिल्ह्याच्याच तीन नेत्यांनी कंबर कसली आहे. विद्यमान आमदार महादेवराव महाडिक यांच्याशिवाय पी एन पाटील आणि माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी सतेज पाटील यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. या तिघांनीही पक्ष नेतृत्वास पत्र लिहून सतेज पाटीलच्या उमेदवारीस विरोध दर्शवला आहे.
राज्यातील काँग्रेस नेते राहुल गांधींना भेटले
By admin | Published: December 04, 2015 1:14 AM