"काय बोलावं, काय लिहाव काही कळत नाही; कधीही न भरून निघणारी हानी"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 11:01 AM2021-05-16T11:01:06+5:302021-05-16T11:03:53+5:30
Rajeev Satav : सातव यांच्या निधनानंतर नाना पटोलेंनी व्यक्त केलं दु:ख
काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे निधन झाले आहे. पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर, डॉक्टरांनी त्वरीत औषधोपचार सुरू केले. शनिवारी दिवसभरात सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कोरोनानंतर आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात देखील केली होती. पण, सातव यांना 'सायटोमेगँलोव्हायरस' या नव्या विषाणूची लागण झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारीच सांगितले होते. दरम्यान, यानंतर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
"आज माझ्यासाठी, तमाम कॉंग्रेसच्या कार्यकर्ता साठी काळाचा दिवस. माझा मित्र, माझा भाऊ राजीव सातव आज आमच्यात नाही. भावपूर्ण श्रद्धांजली. काय बोलाव काय लिहाव काही कळत नाही, ही हाणी कधीही न भरून निघणारी आहे. अलविदा मेरे दोस्त!," असं म्हणत सातव यांच्या निधनानंतर नाना पटोले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
निशब्द..
— Nana Patole (@NANA_PATOLE) May 16, 2021
आज माझ्यासाठी, तमाम कॉंग्रेसच्या कार्यकर्ता साठी काळाचा दिवस.
माझा मित्र, माझा भाऊ राजीव सातव आज आमच्यात नाही.
.
भावपूर्ण श्रद्धांजली
काय बोलाव काय लिहाव काही कळत नाही, ही हाणी कधीही न भरून निघणारी आहे.
अलविदा मेरे दोस्त ! pic.twitter.com/mYU8b0ASJn
गेल्या १५ दिवसांपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. औषधांना ते योग्य प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सत्यपालसिंग यांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे चांगली सुधारणा होत होती. ते आता धोक्याबाहेर असल्याचे बोलले जात होते. असं असताना शुक्रवारी रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यानंत, रविवारी पहाटे त्यांचं निधन झालं. काँग्रसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त दिलं आहे.
मनाला वेदना देणारी बातमी : अशोक चव्हाण
"काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राजीव सातव यांचे निधन झाल्याची वार्ता आज सकाळीच सर्वांना कळाली. अतिशय धक्कादायक आणि निराश करणारी ही बातमी आज आलेली आहे. अतिशय वेदना देणारी आणि मनाला न पटणारी अशा प्रकारची ही घटना घडलेली आहे राजीव सातव धडाडीचे नेते होते. अतिशय अल्प काळामध्ये त्यांनी जिल्ह्यापासून ते थेट राष्ट्रीय पातळीपर्यंत आपल्या कर्तुत्वाने त्या ठिकाणी आपली उंची वाढवली. काँग्रेस पक्षामध्ये अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने काम करणारा असा हा सहकारी आज आमच्यामधून गेल्याची खंत आम्हा सर्वांना आहे," असं म्हणत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी दु:ख व्यक्त केलं.