मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पश्चिम महाराष्ट्र, कोकणात जीवित आणि वित्तहानी झालेली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या राज्यातील पूरपरिस्थितीवर मात करण्यास राज्य सरकारकडून दुर्लक्ष केल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे.
राज्यातील पूर परिस्थितीचा सामना करण्यास राज्यातील सरकार पूर्णपणे अपयशी पडले आहे. मुसळधार पावसाने पश्चिम महाराष्ट्र, कोकणात जीवित व वित्तहानी झाली आहे. त्याला सरकारची नियोजनशून्यता व निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी राज्यातील पूर परिस्थितीकडे सरकारने दुर्लक्ष केल्याप्रकरणी महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
याचबरोबर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. पूरपरिस्थीतीवर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह कोकण व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याला महापुराने वेढलेले आहे. या भागातील शेकडो गावांचा संपर्क तुटलेला आहे. कोल्हापूर, सांगलीतील परिस्थीती अत्यंत भीषण आहे. शहराचा बहुतांश भाग पुराने व्यापलेला आहे. गत चार दिवसात होत असलेली अतिवृष्टी व त्यामुळे होऊ शकणारे परिणाम याबाबत गांभीर्याने विचार केला नाही. नियोजन, विभागांतर्गत समन्वय याचा अभाव व नेतृत्वाने केलेले दुर्लक्ष यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे, याला राज्य सरकार व मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत असा आरोप त्यांनी केला.
(पुराचं गांभीर्य नसणाऱ्या भाजपा मंत्र्यांची हकालपट्टी करा; विरोधी पक्षनेत्याची मागणी)
दरम्यान, राज्य सरकारने परिपत्रक काढून दोन दिवस पाण्यात बुडल्यास 10 किलो गहू आणि 10 किलो तांदूळ मोफत मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. या काढलेल्या जीआरनंतर सरकारवर चहूबाजूंनी टीका केली जात आहे. दोन दिवस क्षेत्र पाण्याखाली बुडले असल्यावरच अन्नधान्य मोफत देण्याच्या अटी-शर्थी म्हणजे लोकांच्या जखमेवर मीठ चोळणारा प्रकार असल्याची भावना अनेकांनी मांडली आहे. लोकांना मदत करण्याऐवजी असे जीआर काढून पूरग्रस्तांची थट्टा चालवल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.