"खत दरवाढ दोन दिवसात मागे न घेतल्यास काँग्रेस राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 04:16 PM2021-05-19T16:16:34+5:302021-05-19T16:18:40+5:30

नाना पटोले यांचा इशारा. खतांच्या किंमती वाढवून शेतकऱ्यांना कंत्राटी शेतीसाठी असहाय्य करण्याचा मोदींचा कुटील डाव, पटोले यांचं वक्तव्य

congress leader nana patole on fertilizer price hike is not reversed in two days congress will protest | "खत दरवाढ दोन दिवसात मागे न घेतल्यास काँग्रेस राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करणार"

"खत दरवाढ दोन दिवसात मागे न घेतल्यास काँग्रेस राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करणार"

Next
ठळक मुद्देखतांच्या किंमती वाढवून शेतकऱ्यांना कंत्राटी शेतीसाठी असहाय्य करण्याचा मोदींचा कुटील डाव, पटोले यांचं वक्तव्यगुरुवारी कोकोण दौऱ्यावर जाऊन नुकसानीची पाहणी करणार, पटोले यांची माहिती.

"शेतकऱ्यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण' असून शेतकरी विरोधी तीन काळे कायदे आणल्यानंतर आता रासायनिक खतांच्या किंमती वाढवून शेतकऱ्यांना उद्धवस्त करण्याच्या मोहिमेला मोदींनी वेग दिला आहे. दीडपटीने वाढलेल्या खतांच्या किंमतीमुळे शेतकऱ्यांना शेती करणे परवडणार नाही व मोठ्या उद्योगपतींना शेती कंत्राटीपद्धतीने देण्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय राहू नये म्हणूनच ही दरवाढ केली आहे," असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तसंच दोन दिवसात ही अन्यायकारक खत दरवाढ मागे घ्यावी अन्यथा काँग्रेस पक्ष राज्यभर घंटानाद आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

"कोरोनाच्या संकटाने शेतकरी पुरता पिचला गेला आहे. त्याला आधार देण्याऐवजी खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून त्यांच्यावर आणखी अन्याय केला आहे. तीन काळे कृषी कायदे आणून मोदी सरकारने शेतकऱ्यांना बड्या उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचा विडा उचलला आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत केलेली दीडपट वाढ हे त्या दृष्टीनेच टाकलेले पाऊल आहे. दीडपट हमीभाव देण्याची घोषणा करणाऱ्या मोदींनी हमीभावाऐवजी शेतकऱ्यांना येणारा उत्पादन खर्च दीडपट वाढवला आहे. पेट्रोल-डिझेल, खाद्यतेलांच्या दरवाढीमुळे अगोदरच जनतेचे कंबरडे मोडले असताना रासायनिक खतांच्या दरवाढीचा बोजा शेतकऱ्यांवर टाकला आहे," असंही पटोले म्हणाले. एका बाजूला शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा केल्याचा गाजावाजा करून दुसऱ्या बाजूला खतांच्या किंमती वाढवून प्रत्यक्षात शेतकऱ्यांची लूट करत उद्योगपती मित्रांची घरे भरण्याचे काम मोदी करत असल्याचेही ते म्हणाले. 

नुकसानीची पाहणी करणार

"तौक्ती चक्रीवादळाने महाराष्ट्र, गुजरातसह इतर राज्यातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त गुजरातचाच दौरा करून नुकसानीची पाहणी करत आहेत. चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झाले आहे त्या भागाचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत? नरेंद्र मोदी फक्त गुजरातचेच पंतप्रधान आहेत का?," असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला. कोकणात चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. घरे, नारळ, आंब्याच्या बागांसह मच्छीमारांच्या बोटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे प्रशासनाकडून झालेल्या नुकसानाची माहिती घेत आहेत. पंचनाम्याचे काम सुरु असून नुकसानग्रस्तांना लवकरच मदत देण्यात येईल. मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख दौरे करून झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ही नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत आपण स्वतःही गुरुवारी कोकणाच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे नाना पटोले म्हणाले. 
 

Web Title: congress leader nana patole on fertilizer price hike is not reversed in two days congress will protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.