सोमवारी श्रेष्ठींच्या नाराजीची, तर आता पटोले यांच्या समर्थनाची भाषा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 09:07 AM2021-07-14T09:07:45+5:302021-07-14T09:09:46+5:30
तणाव निर्माण करणारी विधाने कोणी करू नयेत, जे प्रश्न असतील ते चर्चेतून सोडवता येतील, वादावर काँग्रेस प्रभारींचं स्पष्टीकरण.
मुंबई : एखादे चुकीचे मत पुढे आले, तर महाविकास आघाडीत तणाव निर्माण होईल. त्यामुळे तणाव निर्माण करणारी विधाने कोणी करू नयेत, जे प्रश्न असतील ते चर्चेतून सोडवता येतील. जर काही कुरबुरी झाल्यात, तर काँग्रेसच्या वतीने ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे दोघे संवाद साधण्याचे काम करतील, या शब्दांत काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांनी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांनी मंगळवारी नाना पटोले यांची पाठराखण केली. मात्र, वादग्रस्त विधाने कोणीच करू नयेत, अशी भूमिकाही मांडली.
सोमवारी राज्यातील काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यावर पक्षश्रेष्ठी नाराज आहेत, असे सांगत होते. मात्र, मंगळवारी ‘लोकमत’मध्ये ‘नाना पटोले यांना राहुल गांधी यांचा वरदहस्त’ अशी बातमी प्रकाशित झाली आणि पत्रकार परिषदेत सगळ्याच नेत्यांनी पटोले यांची पाठराखण केली. जो काही वाद निर्माण झाला त्याचे खापर पक्षाचे प्रभारी एच.के. पाटील यांनी माध्यमांवर फोडले. पटोले यांचे विधान मोडतोड करून माध्यमांनी दाखवले. पटोले यांच्या बोलण्याचा रोख केंद्र सरकारवर होता. आता हा विषय पूर्णपणे संपला आहे, असेही पाटील म्हणाले.
काँग्रेसने महागाईच्या विरोधात सुरू केलेल्या आंदोलनाकडे जनतेचे लक्ष जाऊ नये म्हणून जाणीवपूर्वक भाजप अशा चुकीच्या बातम्या पसरवत आहे, असा आरोप खुद्द पटोले यांनी केला. अन्य नेत्यांनीही भाजपवर जोरदार हल्ला चढवला. पंकजा मुंडे ओबीसी नेत्या आहेत. ज्या पद्धतीने भाजपमध्ये ओबीसी नेत्यांचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न होत आहेत, त्यातून भाजपचा डाव स्पष्ट दिसून येतो, असा आरोपही पटोले यांनी केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लसीकरणाची अंमलबजावणी करताना पोरखेळ केला आहे, असा आक्षेप नोंदवला.
भाजपमध्ये कौरव कोण, आणि पांडव कोण?
भाजपमध्ये कौरव कोण, आणि पांडव कोण हे त्यांचे त्यांनी ठरवावे. त्यांचीच सेना, त्यांचेच कौरव, त्यांचेच पांडव आणि अंगणही त्यांचेच, त्यामुळे महाभारतही तिकडेच आहे. ते त्यांनाच लखलाभ राहो, अशी टीका मदत पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.