जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणारे मोदी सरकार लुटारू; नाना पटोलेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2021 02:14 PM2021-03-01T14:14:10+5:302021-03-01T14:17:39+5:30
पेट्रोल आणि डिझेलवर अवाजवी करवाढ करून दिवसाढवळ्या जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणारे केंद्रातील भाजपचे सरकार लुटारू आहे, अशी जोरदार टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. नाना पटोले यांच्यासह विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच काँग्रेस मंत्री व आमदारांनी सायकलवरून प्रवास करत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधान भवनात पोहोचले.
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलवर अवाजवी करवाढ करून दिवसाढवळ्या जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणारे केंद्रातील भाजपचे सरकार लुटारू आहे, अशी जोरदार टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. नाना पटोले यांच्यासह विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच काँग्रेस मंत्री व आमदारांनी सायकलवरून प्रवास करत अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधान भवनात पोहोचले. (congress leader nana patole slams modi govt over fuel price hike)
पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसमध्ये प्रचंड दरवाढ करून केंद्रातील मोदी सरकारने जनतेचे जगणे मुश्कील केले आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी काँग्रेसचे सर्व मंत्री, आमदार आणि नेत्यांनी मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यानंतर नाना पटोले प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सर्व आरोपांवर उत्तरं देण्यास बांधील नाही; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
इंधनावर भरमसाठ करवाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असताना केंद्र सरकार इंधनावर भरमसाठ करवाढ करून लूट करत आहे. त्यात आणखी १८ रुपये रस्ते विकास सेसच्या माध्यमातून तर ४ रुपये कृषी सेसच्या माध्यमातून घेतले जात आहेत. करांशिवाय पेट्रोलची किंमत ३२ रुपये ७२ पैसे प्रति लीटर आणि डिझेलची किंमत ३३ रुपये ४६ पैसे प्रति लीटर आहे. परंतु, मोदी सरकारने इंधनावर एक्साईज ड्यूटी लावून पेट्रोलचे दर १०० रुपये आणि डिझेलचे दर ९० रुपये लीटरपर्यंत वाढवले, असे नाना पटोले यांनी सांगितले.
लोकांच्या जखमेवर मीठ चोळले
एलपीजी गॅस सिलींडरच्या आज पुन्हा दरात २५ रुपयांची वाढ केली आहे. जनतेमध्ये या महागाईविरोधात प्रचंड असंतोष असून, मोदी सरकारने निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. जनता महागाईने होरपळून गेली असताना थंडीमुळे दरवाढ झाल्याचा जावाई शोध लावून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांनी लोकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. केंद्र सरकारने ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.