मुंबई : पंजाबमधील सुनील जाखड आणि गुजरातमधील युवा नेते हार्दिक पटेल यांनी नुकतीच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकातून काँग्रेस नेतृत्वाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका करण्यात आली. शिवसेनेच्या या टीकेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. "ज्यांना बलिदानाची पार्श्वभूमी नाही त्यांना काँग्रेस काय कळणार?" असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.
नाना पटोले म्हणाले, "काँग्रेस एक विचार आहे. विचार कधीही संपत नाही. देशाचा स्वातंत्र्यलढा असो किंवा देशाचे महासत्ता बनवण्यासाठीचे प्रयत्न, यामध्ये काँग्रेसने नेहमीच स्वत:ला झोकून दिले आहे. आज आम्ही माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी साजरी करत आहोत. राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले आणि आजच्याच दिवशी काही लोक आमच्यावर टीका करत आहेत. केंद्रातल्या भाजपा सरकारमुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. सरकारी मालमत्ता विकली जात आहे. या गोष्टींवर अग्रलेख लिहायची गरज आहे."
'सोबत राहून घात करू नका'भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीत आहोत. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण पाहिले असेल, काही लोक भाजपालाच मदत करण्याचा प्रयत्न करून घात करत आहेत. विकासनिधीबाबतही समानता ठेवणं आवश्यक आहे. याबाबतही काँग्रेसवर अन्याय केला जात आहे. निधीच्या समतोलावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालायला हवे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले.