मुंबई:काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. 'काँग्रेसची अवस्था जमीनदारांसारखी झाली आहे. त्यांच्याकडील जमीन गेल्या आता फक्त हवेली उरली आहे', असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं होतं. त्यावर नाना पटोलेंनी, 'काँग्रेसनं अनेकांना जमीनी राखायला दिल्या, त्यांनीच जमीनी चोरल्या, डाका टाकला', अशा शब्दात नाना पटोलेंनी पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
मीडियाशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, 'काँग्रेसनं अनेकांना जमीन राखायला दिली. ज्यांना राखण्यासाठी जमीन दिली त्यांनीच डाका मारला. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असं शरद पवार यांना म्हणायचं असेल', असा टोला पटोलेंनी लगावला. तसेच, काँग्रेसनं जमीनदारी केली नाही, उलट ज्यांना शक्ती दिली त्यांनीच काँग्रेसचा घात केला. काँग्रेसच्या नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे, तो आम्ही चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
काय म्हणाले होते शरद पवार ?एका मुलाखतीत शरद पवार म्हणाले की, आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झालीय. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं हिरवंगार शिवार माझं होतं, असं सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची झालीय. असं असलं तरी काँग्रेस आजही रिलेवन्स असलेला पक्ष आहे. देशभर पसरलेला पक्ष आहे. काँग्रेसकडे लोकसभेत दीडशेच्या घरात संख्याबळ असल्यामुळेच युपीएसारखा प्रयोग झाला. पण आज काँग्रेसकडे केवळ चाळीसच जागा आहेत, असं पवार म्हणाले होते.