Vijay Wadettiwar reaction, Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 Live : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाचे अंतरिम बजेट आज विधानसभेत मांडले. त्यात केवळ आमची हे करण्याची तयारी आहे, ते करण्याचा विचार आहे, अशा सगळ्या गोष्टींपलिकडे महाराष्ट्राच्या बजेटमध्ये काहीही दिसून आले नाही. महिला सक्षमीकरणाचा उल्लेख झाला पण ठोस उपाययोजना दिसलेल्या नाहीत. आजच्या या बजेटबद्दल बोलायचे तर महाराष्ट्र पुन्हा खड्ड्यात घालण्याचं काम या सरकारकडून होत आहे हे आता सिद्ध झाले आहे. ही तीनही मंडळी मिळून जे काम करत आहेत, ते पाहता यांनी बाकी सगळ्या तरतूदी करून ठेवल्या आहेत. पक्षफोडीसाठी एखादी तरतूद करून ठेवतील असेही मला वाटले होते. तेवढीच एक तरतूद यांनी केली नाही. महाराष्ट्राच्या दृष्टीने यापेक्षा दुर्दैवी बजेट दुसरे असूनच शकत नाही, अशा शब्दांत वडेट्टीवारांनी सरकारचा समाचार घेतला.
"शेतकरी, शेतमजूर, महिला, बेरोजगार यांसंबंधी बजेटमध्ये कुठलेही ठोस प्रावधान दिसलेले नाही. सत्ताधाऱ्यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी फक्त स्मारकं आणि स्मारकांसाठी निधी हेच यांचे उद्देश आहे. त्यातूनच मते मिळवणे हे त्यांचे प्लॅनिंग आहे. पण महाराष्ट्र ज्या ढासळत्या स्थितीत आहे, तेथून राज्याला सांभाळणे आणि पुन्हा सक्षमपणे उभं करणं हे या बजेटमध्ये नाही", याकडे वडेट्टीवारांनी लक्ष वेधले.
"महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही राज्याला सुस्थितीत आणले होते. पण या लोकांनी महाराष्ट्राला कर्जबाजारी करून ठेवले आहे. आज राज्यावरचं कर्ज खूप वर गेलं आहे. मिळकत काहीच नाही, कर्ज काढून घर चालवत असल्यासारखी आपली स्थिती झाली आहे. महाविकास आघाडीच्या वेळी जे राज्य सुस्थितीत होतं त्या राज्याला खड्ड्यात घालायचे राम पुन्हा सुरू झाले आहे," अशी बोचरी टीका वडेट्टीवार यांनी केली.