उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेसचा स्पष्ट नकार; "आधी निवडणूक होऊ द्या, जिंकू द्या..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 12:30 PM2024-08-18T12:30:44+5:302024-08-18T12:32:34+5:30
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा या ठाकरेंच्या मागणीला काँग्रेसकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. निवडणूक जिंकल्यानंतरच मुख्यमंत्री ठरवला जाईल असं काँग्रेसनं स्पष्ट सांगितले आहे.
मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आणावा मी त्याला पाठिंबा देईन असं विधान उद्धव ठाकरे यांनी मविआच्या मेळाव्यात केले. मात्र ठाकरेंच्या मागणीला काँग्रेस-राष्ट्रवादीनं केराची टोपली दाखवली आहे. आधी निवडणूक होऊ द्या, जिंकून द्या, किती आमदार निवडून येतात ते बघू त्यानंतर सरकार कोण चालवेल हे ठरवता येईल अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ठाकरेंच्या मागणीवर दिली आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री झालं तर पाडापाडी होते असं उद्धव ठाकरे म्हणाले परंतु असं कधी होत नाही. त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले आणि आम्ही आमचे मत व्यक्त केले. मुख्यमंत्री इथं ठरत नसतो तर तो श्रेष्ठी ठरवत असतात. पण एक गोष्ट चांगली झाली की लोकांमध्ये, माध्यमांमध्ये सरकार हे महाविकास आघाडीचेच येणार असं वातावरण तयार झालं. निवडणूक होऊ द्या, जिंकून द्या, किती आमदार निवडून येतायेत ते बघू त्यानंतर सरकार कोण चालवेल हे नंतर ठरवता येईल असं त्यांनी सांगितले. चव्हाण हे माध्यमांशी बोलत होते.
तसेच उद्धव ठाकरेंची असं काही आग्रहाची मागणी नाही. ते दिल्लीला गेले आणि आमच्या श्रेष्ठींशी बोलून आलेत. जागावाटप आणि निवडणुकीच्या कामाला लागणं हाच आमच्यासमोरचा विषय आहे. मुख्यमंत्रिपदाचा विषयच नाही. निवडणूक जिंकल्यानंतरच मुख्यमंत्री ठरवला जाईल. जागावाटपावर चर्चा होईल. वेगवेगळे फॉर्म्युले समोर येतायेत. दिवाळी संपल्यावर लगेच महाराष्ट्रातील निवडणूक लागेल. निवडणुका कधीही झाल्या तरी सर्वच राजकीय पक्ष तयार आहेत असं पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सत्ताधाऱ्यांना पराभवाची भीती आहे. त्यामुळे निवडणूका पुढे गेल्या तर बरं होईल. निवडणुकीपूर्वी काही योजना जाहीर केल्यात. त्याचा एखादा हफ्ता जास्त गेला तर त्याचा फायदा होईल असं त्यांना वाटत असावे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आमचा काही आक्षेप नाही. निवडणूक पुढे ढकलण्याबाबत आम्ही काही राजकीय आरोप करणार नाही. निवडणूक आयोगाने त्याचे स्पष्टीकरण दिले आहे ते स्वीकारले पाहिजे असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
धार्मिक धुव्रीकरण करून यश मिळेल असं वाटणं गैरसमज
राज्याच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडू न देता शांतता प्रस्थापित केली पाहिजे. कुणी चुकीचे विधान केले तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. भयमुक्त वातावरणाचं राजकारण आणि निवडणूक झाली पाहिजे. धार्मिक धुव्रीकरण आणि धार्मिक तेढ निर्माण करूनच आपल्याला यश येईल असं कुणाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. लोकांनी निर्णय आर्थिक कारणांसाठी घेतला आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी यांनी निर्णय घेतला. ज्या ८० आमदारांनी गद्दारी केली ते जेव्हा त्यांच्या मतदारसंघात परत जातील तेव्हा निवडणूक कितीही लांबवली तरी त्याचा फायदा होणार नाही असं सांगत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी सत्ताधारी भाजपा महायुतीवर निशाणा साधला आहे.