“INDIA आघाडीमुळे घाबरलेल्या भाजपने NDAची घाईघाईत बैठक बोलावली”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 04:27 PM2023-08-29T16:27:11+5:302023-08-29T16:33:15+5:30

INDIA Vs NDA: इंडिया आघाडी भक्कमपणे उभी असून, भाजपकडून मतविभाजन व्हावे यासाठी BRSसारख्या पक्षांना पुढे केले जात आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केला.

congress leader prithviraj chavan criticised bjp and nda over india alliance meeting | “INDIA आघाडीमुळे घाबरलेल्या भाजपने NDAची घाईघाईत बैठक बोलावली”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका

“INDIA आघाडीमुळे घाबरलेल्या भाजपने NDAची घाईघाईत बैठक बोलावली”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका

googlenewsNext

INDIA Vs NDA: इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाजपकडून होत असलेली टीका हास्यास्पद आहे. देशभरातील २८ पक्ष मोदी सरकार विरोधात एकत्र आले आहेत, बंगलुरुमध्ये इंडिया आघाडीची दुसरी बैठक होत असतानाच नरेंद्र मोदी यांनी  घाईघाईने एनडीएची बैठक बोलावली. इंडिया आघाडीची ताकद पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप घाबरलेले आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

मीडियाशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात ६२ टक्के लोकांनी मतदान केले होते. यावेळी मतांचे विभाजन होऊ द्यायचे नाही असे विरोधी पक्षांनी निश्चित केले आहे. इंडिया आघाडी भक्कमपणे उभी आहे म्हणून भाजपाकडून मतविभाजन व्हावे यासाठी BRS सारख्या पक्षांना पुढे केले जात आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 

राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारमध्ये अंतर्विरोध 

राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारमध्ये अंतर्विरोध आहे. या सरकारला एक वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला तरी अजून त्यांना पालकमंत्री नियुक्त करता आले नाहीत, मंत्रिमंडळ विस्तार करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. निधी वाटपावरूनही सत्ताधारी पक्षांमध्ये वाद सुरु आहेत. सरकारधील वादाचा फटका शेतकरी, तरुण, कामगार, व राज्यातील गुंतवणूकीवर होत आहे. महाराष्ट्रात अस्थिर राजकीय परिस्थिती असल्याने कोणताही मोठा गुंतवणुकदार येत नाही. वेदांता फॉक्सनसारखा मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेला. आताही ऍपल कंपनीने ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तामिळनाडू, कर्नाटक राज्यात केली आहे. यामुळे राज्यातील तरुण रोजगारांपासून वंचित राहत आहेत. कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क वाढवल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. जपान, चीन मध्ये कांदा २००-३०० रुपये किलो आहे, कांदा निर्यात केला तर शेतकऱ्याला जास्त पैसे मिळतील म्हणून केंद्र सरकारने तात्काळ निर्यात शुल्क रद्द करावे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

जननायक राहुल गांधींचा मुंबईत भव्य सत्कार 

देशातील हुकुमशाही मोदी सरकारने काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने कारवाई केली पण राहुल गांधी मोदींच्या हुकुमशाहीला न डगमगता निर्भीडपणे सामोरे गेले. देशभरात भितीचे वातावरण असताना ‘डरो मत’ असा संदेश देणाऱ्या राहुल गांधी यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात करावा, ही काँग्रेसची भावना होती म्हणूनच मुंबईत १ सप्टेंबरला काँग्रेस पक्षाच्या वतीने जननायक राहुल गांधी यांचा भव्य सत्कार केला जाणार आहे. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली. 

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून कोणतीही स्पर्धा नाही वा वादही नाहीत. उद्धव ठाकरे यांनीही मेरिटनुसार जागा वाटप होईल हे स्पष्ट केले असून, काँग्रेस पक्षाची तीच भूमिका आहे. मोदी सरकारचा पराभव करणे हाच मविआचा उद्देश असून ही आघाडी त्यावर भर देत आहे. असे नाना पटोले यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.


 

Web Title: congress leader prithviraj chavan criticised bjp and nda over india alliance meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.