कोल्हापूर: राज्यात एकीकडे सत्तासंघर्ष सुरू असताना, दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारच्या अनेकविध धोरणांवरून तसेच निर्णयांवरून विरोधकांकडून सातत्याने टीकास्त्र सोडले जात आहे. यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केंद्रावर निशाणा साधल असून, मोदी सरकारने एकामागून एक अनेक चुका केल्या, आता घड्याळाचे काटे उलटे फिरवावे लागतील, असे परखड मत व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रात पोरखेळ सुरु झाला आहे, अतिशय नकारात्मकपणे बातम्या येत आहेत, त्यामुळे कितीही कटू असले, तरी न्यायपालिकेला न्याय करून लोकशाही वाचवली पाहिजे, राज्यपालांच्या अधिकारांच्या गैरवापरावर स्पष्टपणे नमूद केले पाहिजे, घड्याळाचे काटे उलटे फिरवावे लागले तर फिरवावे लागतील, पण राज्यातील लोकशाही वाचावीच लागेल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शिवसेनेतील फुटीर विलीनीकरणाचा मुद्दा विसरून गेले
शिवसेनेतून दोन तृतियांश फुटून बाजूला गेले, पण विलीनीकरणाचा मुद्दा विसरून गेले. त्यामुळे गुवाहाटीतून राज्यात परतल्यानंतर वकीलांशी चर्चा केल्यानंतर हा मुद्दा फुटीर गटाच्या लक्षात आला असावा. सर्वोच्च न्यायालयाच्या व्हेकेशन खंडपीठाने शपथविधीसाठी दिलेली परवानगी चुकीची होती, असा आरोप चव्हाण यांनी केला आहे. तसेच राज्यपालांनी दोघांचा शपथविधी करून टाकला, त्यांना कशाचेच बंधन नाही. विधिमंडळाचे अधिवेशन फक्त मुख्यमंत्री बोलवू शकतात, त्यानंतर अध्यक्षांची निवड लावली, त्यापूर्वी दीड वर्ष अध्यक्षांची निवडणूक कायदेशीर बाब आहे, म्हणून लांबणीवर लावली, न्यायपालिकेने प्रामाणिक न्याय केला, तर सगळे बेकायदेशीर असल्याचा हल्लाबोल केला. घटनेनुसार किमान १२ मंत्री असावे लागतात, त्यामुळे घटनेचे उल्लंघन झाल्याचा दावा चव्हाण यांनी केला.
दरम्यान, मोदी सरकारने आतापर्यंत भरमसाठ कर्ज काढलेय. आता नवीन कर्ज मिळेल असे वाटत नाही. देशात कर वाढवले आहेत. पंडित नेहरूंच्या दूरदृष्टीतून उभा राहिलेल्या संस्था विकल्या जात आहे. नोट बंदी फसली आहे. अनेक अविचारी निर्णय केंद्र सरकार कडून घेतले जात आहेत. देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. अर्थव्यवस्थेबाबत कोरोनाचे कारण दिले जाते मात्र ते खरे नाही. कोरोनाच्या आधीपासून अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. मोदी सरकारकडून एकामागून एक चुका होत गेल्याचा परिणाम झाला आहे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.