"स्वराज्यासाठी काँग्रेसनं आणि शिवछत्रपतींनी काय केले हे माफीवीरांना कळणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 03:40 PM2024-09-02T15:40:12+5:302024-09-02T15:40:56+5:30

मालवणातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणानंतर काँग्रेस आणि भाजपा यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. 

Congress leader Prithviraj Chavan criticizes BJP and Devendra Fadnavis | "स्वराज्यासाठी काँग्रेसनं आणि शिवछत्रपतींनी काय केले हे माफीवीरांना कळणार नाही"

"स्वराज्यासाठी काँग्रेसनं आणि शिवछत्रपतींनी काय केले हे माफीवीरांना कळणार नाही"

मुंबई - काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यासाठी किती त्याग भोगला आहे, नेहरूंसारख्या व्यक्तीनं नगर जिल्ह्यात ९-१० वर्ष जेलमध्ये काढली आहेत. मात्र यांच्या लोकांनी माफीनामे लिहिलेत. त्यामुळे माफीवीरांना स्वराज्यासाठी काँग्रेसनं काय केले आणि शिवछत्रपतींनी काय केले हे कधीच कळणार नाही अशा शब्दात काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. 

पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत भाजपाचा समाचार घेतला. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे सुशिक्षित आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया हे इंग्रजीतील मूळ पुस्तक आहे. त्यातला उतारा आहे. नेहरूंचं इंग्लिश त्यांना समजत नसेल तर त्यांनी शिक्षकांना, प्रोफेसरांना विचारावा. या पुस्तकात अतिशय स्पष्ट लिहिलंय, शिवछत्रपतींनी स्वराज्य निर्मितीसाठी परकीयांवर आक्रमण केले. त्यांचे किल्ले, खजिना लुटला. हे स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. ज्यांनी आयुष्यभर इंग्रजांची चाकरी केली त्यांना याची कल्पना येणार नाही असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला. 

तसेच राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. भाजपाला केवळ सत्ता कशी मिळवायची या राजकारणात रस आहे. सरकारचं दुर्लक्ष होतंय. प्रशासनावर कुणाचा अंकुश नाही. बदल्यांमध्ये आर्थिक व्यवहार होतात त्यामुळे चांगल्या प्रशासनाची अपेक्षाही करणं गैर आहे. बदलापूर, मालवण आणि पुण्यासारख्या घटनेमुळे कायदा सुव्यवस्था परिस्थिती रसातळाला पोहचली आहे. महाराष्ट्राचं प्रशासन कोण चालवतायेत? गुंड चालवतायेत, बिल्डर चालवतायेत काही कळत नाही. देशातील एकूण आत्महत्येपैकी ३७ टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होतायेत. सगळ्या आघाडीवर हे सरकार संपूर्ण अपयशी ठरलंय. निवडणूक पुढे ढकलण्याचा केविळवाणा प्रयत्न सुरू आहे. गृहमंत्रालय अपयशी ठरलं आहे असा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केला. 

...तर राष्ट्रपती राजवट लागू शकते 

दरम्यान, राष्ट्रपती राजवट लावायचा केंद्र सरकारला पूर्ण अधिकार आहे. राजकीय सोयीकरता केंद्रीय मंत्रिमंडळ निवडणूक आयोगाला विधानसभा निवडणुका पुढे मागे ढकलण्याचं सांगू शकते. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्याच्या निवडणूक एकत्र व्हायच्या मात्र यावेळी दोन्ही निवडणूक वेगवेगळी घेण्याचा प्रयत्न चालला आहे. हरियाणा निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्राची निवडणूक होईल असं बोललं जातं. परंतु ज्याप्रकारे लोकसभेत भाजपाचा पराभव झाला ते त्यांना अपेक्षित नव्हते. त्यांनी ४००  पार उद्दिष्ट ठेवले होते. परंतु भाजपा अजूनही त्या पराभवाच्या धक्क्यातून सावरली नाही. निवडणूक लांबवली तर कदाचित परिस्थिती सुधारेल असं त्यांना वाटतं. २६ नोव्हेंबरच्या आत निवडणूक घ्यावी लागेल जर त्यानेही काही भागणार नसेल तर राष्ट्रपती राजवट आणण्याचा आणखी एक पर्याय सरकारकडे आहे. निवडणूक कधीही झाली तरी देशातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे असंही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं. 

हाकेंनी भाजपाची सुपारी घेतलीय

हाके राजकारणात नवीन आहेत. माझा त्यांच्याशी परिचय नाही. मी कुणाची सदिच्छा भेट घेतली, तब्येत विचारायला गेलो हा माझा हक्क आहे. तिथे राजकारण बघायचं कारण नाही. माझी मराठा आरक्षणावरील भूमिका जगजाहीर आहे. कारण मी पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना १६ टक्के आरक्षण समाजाला दिले होते. आम्ही कुठल्याही ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण दिले होते. नागपूर विधानसभेत मराठा आणि इतर आरक्षणावरचं माझं भाषण लक्ष्मण हाकेंनी वाचावे त्यांना मी प्रत पाठवण्याची व्यवस्था करतो. राहुल गांधी लोकसभा निवडणुकीत काय बोलले हे सगळ्यांना ठाऊक आहे. त्यांनी ओबीसींच्या हिताकरता जातीय जनगणना करण्यासाठी आक्रोश केलेला आहे. जर हाकेंना हे समजत नसेल तर ते भाजपाची सुपारी घेऊन काम करतायेत. जर भाजपाची सुपारी घ्यायची असेल तर तुम्ही त्यांच्यात प्रवेश करून निवडणुकीला सामोरे जा. हा तुमचा मुलभूत हक्क आहे. कुणाविरोधात आंदोलन करायचा असेल तर तोही कायदेशीर अधिकार आहे असं प्रत्युत्तर पृथ्वीराज चव्हाणांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना दिले आहे.
 

Web Title: Congress leader Prithviraj Chavan criticizes BJP and Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.