भारत-चीनमध्ये गलवान खोऱ्यात सुरू असलेला संघर्ष, हे केंद्रीय संरक्षणमंत्र्यांचं अपयश आहे, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे निसंदिग्धपणे सांगून राष्ट्राच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये, असं मत राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले होते. मात्र शरद पवारांच्या या विधानावरुन काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, चीनच्या प्रश्नावर राजकारण करू नये, हे खरे आहे. पण, विरोधी पक्षाला प्रश्न विचारण्याचा पूर्ण हक्क आणि अधिकार आहे. त्यामुळे काँग्रेस प्रश्न विचारणारच. तसेच आम्ही घरगुती कामासाठी सरकारला प्रश्न विचार नाही. जनतेचा आवाज म्हणूनच केंद्र सरकारला प्रश्न विचारत आहोत, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढी विरोधात काँग्रेसचे साताऱ्यात आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कमिटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांच्या भारत-चीन प्रश्नी राजकारण न करण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.
चीनने १९६२ नंतर भारताचा ३६ हजार किलोमीटर भूभाग ताब्यात घेतला, हे सत्य आहे आणि याकडे पूर्वीच दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसते. गलवान परिसरात भारत रस्ता तयार करतोय. सियाचीन भागातील दळण-वळणासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर चीनचे सैन्य घुसखोरी करत आहे. अशा घटना वारंवार घडतात; परंतु १९९३ मध्ये मी संरक्षणमंत्री असताना या परिसरात दोन्ही सैन्यांनी शस्त्राचा वापर करायचा नाही, असा करार केला होता. सध्याच्या परिस्थितीत देखील कुठेही दोन्ही देशांच्या सैनिकांकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेले नाही. हाणामारीचे प्रकार घडले, असे म्हणत पवार यांनी यावरुन कुणी सरकारला लक्ष्य करू नये, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं.